Pune Rave Party : पुणे रेव्ह पार्टीनंतर आता खडसेंच्या पीएचं प्रकरण समोर, रुपाली चाकणकरांनी काय सांगितलं?
रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्या पीएबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे.

Pune Rave Party : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. एका घरात चालू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या पार्टीमध्ये गांजासदृश तसेच नशेसाठी वापरले जाणारे इतर पदार्थ आढळून आले आहेत. दरम्यान, आता खुद्द खडसे यांचे जावईच रेव्ह पार्टीत सापडल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्या पीएसंदर्भात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाचा चाकणकर यांनी याआधीही उल्लेख केलेला आहे.
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या पार्टीतील आरोपी प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जवाई आणि रोहिणी खडसे यांचे पती आहेत. त्यामुळेच त्यांनी रोहिणी खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहिणी खडसे यांचा नवरा बोळ्याने दूध पित नाही. आपण लोकांना ज्ञान शिकवतोय आणि आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे, हे पाहिले पाहिजे अशी बोचरी टीका चाकणकर यांनी केली.
खडसे यांचा PA पांडुरंग नापडे यांच्या पत्नीने…
तसेच त्यांनी रोहिणी खडसे यांच्या पीएबाबतही खळबळजनक माहिती दिली आहे. रोहिणी खडसे यांचा PA पांडुरंग नापडे यांच्या पत्नीने माझ्याकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पीएच्या पत्नीवर दबाव आणला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट चाकणकर यांनी केला.
आपल्या दिव्याखाली किती अंधार हे…
तसेच आम्हाला महिलांचा फार पुळका आहे अशा आविर्भावात वावरणारी ही मंडळी आहे.आता रेव्हपार्टी मध्ये सापडले आहेत. पोलीस त्यांच्यावर कारवाई करतीलच. पण आपण लोकांना ज्ञान शिकवतोय आणि आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं, असा सल्लाही चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना दिला.
दरम्यान, एकीकडे रोहिणी खडसे यांच्या पतींना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्यांच्या पीएबाबतही चाकणकर यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
