
सुनील थिगळे
Pune News: पुण्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजितदादांच्या एका विधानानं अख्खी भाजपचं त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच दादांच्या विधानावर व्यक्त व्हावे लागले. या हाबाड्याची चर्चा अजून शमलेली नाही तोवर दादांनी दुसरा मोठा डाव टाकला आहे. पुण्यात भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीतील हे द्वंद पार जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. काय आहे पुण्यातील राजकीय घाडामोड? अजितदादांनी कोणता खेळला मास्टरस्ट्रोक?
त्या गुप्त बैठकीची जोरदार चर्चा
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची आणि अजितदादांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे समोर येत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ११ वर्षांनंतर बुट्टे पाटील पुन्हा “स्वगृही” परतणार का, यावर आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे, तर हे वृत्त समोर येताच भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडल्याचे समजते. दादांना घेरता घेरता, भाजपचेच मोहरे दादा पळवत असल्याची चर्चाही पुण्यात जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुण्याच्या रणांगणात दादांनी फासे आवळायला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे डावपेच सुरु
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय समीकरणात मोठे बदल दिसत आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी काल रात्री पुण्यात जिजाई निवासस्थानावर अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली.खेड तालुक्यातील वराळे येथे बैठक होणार होती मात्र ही बैठक अचानक रद्द करून पुण्यात ही बैठक पार पडली .अजित पवार यांच्याशी बुट्टे पाटील यांचे जुने आणि घट्ट संबंध असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते.
बुट्टे पाटलांनी पदवीधर निवडणुकीत संधी न मिळाल्याने त्यांनी नाराजी होत राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश बापट यांच्या माध्यमातून शरद बुट्टे पाटील भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक लढविली होती.आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी बुट्टे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी बुट्टे पाटील यांच्या पुनप्रवेशासाठी सक्रीय भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकारणात मोठे वळण येण्याचे संकेत मिळत आहेत.शरद बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असला तरी अजित पवार यांची बालेकिल्ल्यात ताकद वाढणार आहे.