Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नाही, घातपात?; बारामतीमधील या गावाची बंदची हाक, राज्यात मुद्दा तापणार?

Ajit Pawar Plane Crash: लोकप्रिय नेते दिवंगत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका व्यक्त होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी तर तीन पत्रकार परिषद घेत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा याविषयीचा संशय बळावत आहे. याचप्रकरणी राज्यात पहिली गाव बंदची हाक बारामती तालुक्यात देण्यात आली आहे.

Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नाही, घातपात?; बारामतीमधील या गावाची बंदची हाक, राज्यात मुद्दा तापणार?
अजित पवार, लोणी भापकर गाव बंदची हाक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 22, 2026 | 8:55 AM

दीपक कापरे /प्रतिनिधी: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. पण हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी तीन पत्रकार परिषद घेत काही पुराव्यांआधारे हा वैमानिकाकडून करवून घेतलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तपास यंत्रणांच्या संथ कारभारावर तसेच VSR कंपनीशी अनेक बड्या नेत्यांचे लागेबंध असल्याबाबत मोठे आरोप केले आहेत. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू होऊनही व्हीएसआर कंपनीची विमानं बिनधास्तपणे उडत आहेत. त्याविषयी कुणालाच काही सोयरसुतकं नाही, या कंपनीवर अद्याप काहीच कारवाई करण्यात आल्याविषयी मोठा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडं आता सर्वसामान्य लोकांमधून सुद्धा याविषयी संशय व्यक्त होत आहे. बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने आता बंदची हाक (Loni Bhapkar Village Bandh)दिली आहे.

लोणी भापकर गाव बंदची हाक

अजित पवार यांचा अपघात नसून घातपातच झाल्याचा संशय असून शासनाने लवकरात लवकर तपास करावा म्हणून बारामतीतील लोणी भापकर गावांमधून पहिली गावबंदची हाक दिली आहे. बारामतीतील लोणी भापकर गाव आज रविवारी, बंद राहणार आहे. समस्त लोणी भापकर ग्रामस्थ यांच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी गाव बंद राहणार आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी गावकरी निवदेन देणार आहेत. गावातील सर्व दुकानं आणि इतर सेवा आज बंद असतील. ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांनी पोलिसांकडे निवदेन दिले आहे.

वैमानिकाचा वापर करून घातपात

आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत तीन पत्रकार परिषद घेतल्या आहेत. त्यांनी या प्रेझेन्टेशन मांडले. काही पुरावे सादर केले. तर कडी जुळवत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि वैमानिक सुमित कपूर यांच्याबाबत संशय व्यक्त केला. वैमानिकाचा वापर करून विमान आदळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यापूर्वी केला होता. दादांच्या विमानात इंधन टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन साठा होता. त्यामुळे मोठा स्फोट झाला असे त्यांनी म्हणणे मांडले.

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

काल दिल्लीत आमदार रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी काल केली. व्हीएसआर कंपनीचे मालक आणि तेलुगु देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का अशी शंका यापूर्वी रोहित पवार यांनी व्यक्त केली. रोहित पवार हे नायडू यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रही लिहणार आहे.