
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve On Parth Pawar) जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी या कथित घोटाळ्याचा आरोप केला. त्यानुसार, 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क (stamp duty) म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावाही दानवेंनी केला. मुळ मालकांना विश्वासात न घेता, साताबारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कमध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. केवळ एक लाखांचे भांडवल असलेल्या कंपनीला या गोष्टी कशा शक्य होतात, असा सवाल दानवेंनी केला. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टँम्प ड्युटीही माफ करण्यात आली. तर अवघ्या 27 दिवसांत हा व्यवहार झाल्याचा दावा दानवेंनी केला.
फडणवीसांवर दानवेंचे टीकास्त्र
राज्यात काय परिस्थिती आहे? देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? अशी टीका त्यांनी केली. मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेतायत अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये लागते. इकडे अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते, असा टोमणा दानवेंनी लगावला.
अशी जमीन घेतच येत नाही, तुमच्यासाठी नियम गुंडाळून ठेवले. भू संपादन झालेली जमीन परत कशी मिळते. महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळते. कोणता नियम पार्थ पवार यांनी पाळला, सर्व खुलासा पार्थ पवार यांनी करावा अशी मागणी दानवे यांनी केली. त्यांनी यावेळी प्रश्नांचा भडीमार केला.
पार्थ पवार अर्थमंत्री यांचे पूत्र असतील. जिथे भू संपादन झालं काही काम झालं नाही ती जमीन सर्वांना द्या अशी आमची मागणी करतो, सरकारने निर्णय घ्यावा. दादा, महिने मंत्रालयातील फाईल पुढे सरकत नाही दोन दिवसात पार्ट पवारांची फाइल कशी सरकली असा सवाल त्यांनी विचारला. राज्याला लुटण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांचा राजकीय वापर केला असेल, ते नाकाने कांदे सोलतात त्यांनी याचे उत्तर द्यावं अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.