पुण्यात भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं, निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
पुण्यात भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर शरद पवारांची पुण्यातील ताकद वाढली आहे.
राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात निरोप दिला जात आहे. पुण्यातही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या असून गणेश भक्तांनीही मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे पुण्यात गणपती विसर्जनादिवशी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. निवडणुका तोंडावर असताना नेते पक्ष सोडून जात असल्याने भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
भाजप नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सव सुरू असताना एका गणपती मंडळामध्ये त्यांनी आगामी काळातील निवडणुक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळीच बापूसाहेब पठारे यांनी तुतारीला मतदान करा असं आवाहन केलं होतं. अखेर गणपती विसर्जनादिवशी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी पवारांच्या पक्षाची वाट पकडली आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
कोण आहेत बापूसाहेब पठारे?
विधानसभा निवडणुक 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बापूसाहेब पठारे निवडून आलं आहे. त्यानंतर 2014 साली त्यांचा पराभव झाला होता. भाजपचे जगदीश मुळीक विजयी झाले होते. निवडणुकीवेळी पक्षात झालेल्या गटबाजीमुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 2019 मध्ये भाजपकडून मुळीक यांनाचा उमेदवारी देण्यात आली. पण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी विजय मिळवला होता. टिंगरे अजित पवार गटात आहेत.
देशभर चर्चा झालेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे चर्चेत आले होते. अल्पवयीन आरोपी मुलीने भरधाव वेगाने एका दुचाकीवर असणाऱ्या तरूण-तरूणीला उडवलं होतं. या अपघातावेळी सुनील टिंगरे यांनी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या सुटकेसाठी मदत केल्याचे आरोप विरोधकांनी केले होते.