मोठी बातमी ! दहीहंडीचा दणदणाट भोवला, पुण्यात पहिला गुन्हा दाखल; काय कारवाई होणार?
पुणे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. बिबवेवाडीतील श्रीकृष्ण तरुण मंडळावर ध्वनी प्रदूषणाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परवानगीपेक्षा जास्त लाऊडस्पीकर वापरल्याने (८ बेस, ८ टॉप) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली असून, अध्यक्षांवरही गुन्हा नोंदवला आहे. पोलिस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याने ही राज्यातील पहिली घटना आहे.

पुण्यात उत्सवात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघालेलं असातनाच पुण्यातून मोठी आली आहे. पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी बिबवेवाडी येथील दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
पुण्याच्या बिबेवाडीतील श्रीकृष्ण तरुण मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल प्रकाश जगताप असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. लाऊड स्पीकरसाठी 4 बेस आणि 4 टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड लावल्या प्रकरणी मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर धडक कारवाई करत या मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त केली आहे. या वर्षीच्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले हे राज्यातील पहिले मंडळ आहे.
नागरिकांना त्रास
बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून पारंपारिक वाद्य वापरण्याचा परवाना घेतला होता. त्यात लाऊडस्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करुन 8 बेस आणि 8 टॉप असे लाऊड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे.
पोलीस आयुक्तांचा इशारा
दहीहंडी उत्सवात लाऊडस्पीकरसाठी केवळ 4 बेस आणि 4 टॉप लावण्याची परवागनी देण्यात आली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच त्याची माहिती दिली होती. तसेच शहरातील ध्वनी प्रदूषण टाळण्याचं आवाहनही त्यांनी सर्व मंडळांना केलं होतं. तसेच अधिक लाऊडस्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, पुण्यात दहीहंडीचा धुमधडाका सुरू आहे. अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून आणि नियमांचं पालन करून दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. काही ठिकाणी तर पारंपारिक वाद्य वाजवून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. पुण्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागल्याचं कोणतंही वृत्त नाहीये.
