नितीन गडकरींकडून पुणेकरांना गिफ्ट; कात्रज जंक्शनजवळ सहापदरी उड्डाणपूल उभारणार

पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. | flyover at Katraj junction

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:01 PM, 8 Apr 2021
नितीन गडकरींकडून पुणेकरांना गिफ्ट; कात्रज जंक्शनजवळ सहापदरी उड्डाणपूल उभारणार

पुणे: पुण्याच्या कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे. कारण, केंद्र सरकारने कात्रज जंक्शनच्या परिसरात सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने (Central govt) 169.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल पुणे शहर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्यात येईल. (Nitin Gadkari  sanctions Rs 169.15 cr for six lane flyover at Katraj junction in Pune Maharashtra)

भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली. यापूर्वी पुणे महानगरपालिकेने कात्रज जंक्शनजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, हे काम रखडून पडले होते. मात्र, हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनवर असल्याने नितीन गडकरींनी काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

कसा असेल हा उड्डाणपूल?

कात्रज जंक्शनवर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल 1,326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल. पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे.

गडकरींकडून रोहित पवारांची मागणी मान्य

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी गडकरी यांनी मंजूर केली आहे. आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी गडकरी यांनी 399.33 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून या मार्गातील आढळगाव ते जामखेड या 62.77 किमी. मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी 399.33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघाचे भाग्य उजळले आहे. प्रवासी वाहतूकीसह कारखानदारी वाहतूकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे. नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.

संबंधित बातम्या:

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

महामार्गांच्या शेजारी झाडं लावली नाहीत तर याद राखा; नितीन गडकरींचा कंत्राटदारांना इशारा

महाराष्ट्रासाठी खुशखबर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महत्वाच्या मार्गांसाठी मोठा निधी

(Nitin Gadkari  sanctions Rs 169.15 cr for six lane flyover at Katraj junction in Pune Maharashtra)