'त्या' महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

एखादे काम पूर्ण झाले की, संबंधितांचे अभिनंदन करायचे असते. पण, ही इमारत बांधल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणार कसे? | Nitin Gadkari

'त्या' महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी प्राधिकरणातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला. मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकारी किती नालायक असू शकतात, हे या प्रकल्पातील दिरंगाईवरून सिद्ध होते, अशी तीव्र टीका गडकरी यांनी केली. (Nitin gadkari slams NHAI officials for delay in work)

नितीन गडकरी यांनी सोमवारी दिल्लीच्या द्वारकामध्ये प्राधिकरणाच्या कार्यालय इमारतीचे दूरचित्रसंवाद माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी इमारत उभारण्यात दिरंगाई झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचा जाहीरपणे पाणउतारा केला. अकार्यक्षम कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होतो. याच अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होतात, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

एखादे काम पूर्ण झाले की, संबंधितांचे अभिनंदन करायचे असते. पण, ही इमारत बांधल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणार कसे? 2008 मध्ये ही इमारत बांधण्याचा निर्णय झाला, 2011मध्ये निविदा काढल्या. हे 200 कोटींचे काम पूर्ण व्हायला तब्बल नऊ वर्षे लागली. तोपर्यंत केंद्रात दोन सरकारे आली आणि प्राधिकरणाचे आठ अध्यक्षही बदलले. ज्या ‘महान’ अधिकाऱ्यांनी इमारत उभी करण्यासाठी नऊ वर्षे लावली, त्यांची छायाचित्रे या इमारतीत लावली पाहिजेत, अशी उपहासात्मक टिप्पणी गडकरी यांनी केली.

काही अधिकारी प्रकल्पासंदर्भात निर्णय घेण्यास विलंब लावतात, कामात गुंतागुंत निर्माण करतात. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक अशा पदांवर हे अधिकारी बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची किंवा त्यांना निरोप देण्याची वेळ आता आली आहे. जेणेकरून प्राधिकरणाच्या कामाकाजात सुधारणा होईल, असे गडकरी यांनी म्हटले.

द्वाराक येथील प्राधिकरणाची इमारत 2008 मध्ये बांधण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी 2011 साली निविदा काढण्यात आल्या. मात्र, यानंतर ही इमारत बांधायला नऊ वर्षांचा अवधी लागला. सुमारे एक लाख कोटींचा दिल्ली-मुंबई महामार्ग प्रकल्प तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या इमारतीस अधिकाऱ्यांनी नऊ वर्षे लावली. अधिकाऱ्यांच्या या अकार्यक्षमतेची मला लाज वाटते, असेही गडकरी यांनी म्हटले.

इतर बातम्या:

आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, विदर्भवाद्यांवर गडकरींचा संताप

नितीन गडकरींचा अभिनव उपक्रम, खादीचे चप्पल-बूट लाँच

(Nitin gadkari slams NHAI officials for delay in work)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *