मेडिकल स्टोअर्सवाल्यांना नोटा मोजण्यासाठी वेळ कसा मिळतो?; अजितदादांनी फटकारले

मेडिकल स्टोअर्सवाल्यांना नोटा मोजण्यासाठी वेळ कसा मिळतो?; अजितदादांनी फटकारले
ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कोरोना टेस्टची किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर नोंद ठेवण्यात वेळ जात असतो, अशी मेडिकल स्टोअर्स चालकांची तक्रार आहे, असं पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 22, 2022 | 3:54 PM

पुणे: कोरोना टेस्टसाठी किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर लिहून ठेवणे मेडिकल स्टोअर्स चालकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यावर मेडिकल स्टोअर्स चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, या मेडिकल स्टोअर्स चालकांना चांगलंच फटकारलं आहे. नोटा मोजताना कसा वेळ मिळतो?, असा सवालच अजित पवार यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कोरोना टेस्टची किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर नोंद ठेवण्यात वेळ जात असतो, अशी मेडिकल स्टोअर्स चालकांची तक्रार आहे, असं पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर, त्यात स्टोअर्स चालकांना वेगळी काय माहिती घ्यायची आहे. माहिती म्हणजे केवळ नंबर घ्यायचे आहेत. नोटा मोजायला कसा वेळ मिळतो. नोटा मोजेपर्यंत दहाआकडी नंबर लिहून होतो, असं सांगतानाच किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर लिहून ठेवणे बंधनकारक ठेवायलाच पाहिजे, असं पवार यांनी सांगितलं.

जलतरण तलाव सुरू करा

जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

वर्धक मात्रेसाठी सुविधा देण्याचे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या.

रुग्णांना उपचार सुविधा देण्याच्या सूचना

शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांशी नागरीक घरीच उपचार घेत असले तरी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयानाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Pune School | पुण्यात शाळा, कॉलेज बंदच, पण काय राहणार सुरू; काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात कोविडमुक्त गाव अभियान राबवणार, ग्रामपंचायतींना मिळणार 50 लाखाचे बक्षीस: अजित पवार

Ramp Walk असाही! मावळात भरला बैलांचा भव्य रॅम्प वॉक; पाहा, कोण जिंकलं..?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें