वारकरी संप्रदायाचे विचार आचरणात आणल्यास जगात लढाया, दंगे, भानगडीच होणार नाहीत; भुजबळांचे आवाहन

वारकरी संप्रदायाचे विचार आचरणात आणल्यास जगात लढाया, दंगे, भानगडीच होणार नाहीत; भुजबळांचे आवाहन
वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी या संस्थेचा हिरकमहोत्सव व ज्येष्ठ वारकऱ्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या सुप्रसिद्ध अशा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली आहे. हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण पै जाहला ॥ असे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर महाराज या विश्वाचे गुरू झाले. खरेतर संपूर्ण विश्वाला कवेत घेऊ पाहणारी ही संकल्पना आहे. भारतामध्ये संपूर्ण विश्व हे आपल्या घरात सारखे आहे आणि विश्वातील सर्व जीवमात्र हे आपले बांधव आहेत. ही भावना भारतामध्ये वारकरी संप्रदायाने रुजवली.

मनोज कुलकर्णी

|

Mar 27, 2022 | 4:56 PM

मुळशी: वारकरी (Warkari) संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा संप्रदाय नाही. या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती, पंथाच्या स्त्री – पुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. वारकरी संप्रदायाचे विचार आचरणात आणले, तर जगात लढाया, दंगे भानगडीच होणार नाहीत. जगभरात शांतता नांदेल असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी या संस्थेचा हिरकमहोत्सव व ज्येष्ठ वारकऱ्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सुभद्रा लॉन्स मुळशी पुणे येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोकराव मोहोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब ढमाले, माजी आमदार शरदराव ढमाले, राजाभाऊ ठोंबरे, शांताराम इंगवले यांच्यासह वारकरी संप्रदाय समाज मुळशीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संतांना जातीत विभागले जातेय…

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्यांनी आयुष्यभर वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले अशा जेष्ठ वारकऱ्यांचा आपण सत्कार करतोय याचा मला मनापासून आनंद आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी असून, महाराष्ट्राला संतांची पुराणापासून परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृतीत संतांना खूप महत्त्व आहे. संत आपल्याला खऱ्या भक्ती ची शिकवण देऊन चांगला मार्ग दाखवतात. मात्र, आज काल महाराष्ट्रात प्रत्येक संताला वेगवेगळ्या जातीत विभागले जात आहे. आम्ही अल्पबुद्धीमुळे संतांच्या सुद्धा जातीजातीत वाटण्या केल्या. संत तुकाराम कुणब्यांचे, संत नामदेव शिंपी, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा शुद्र, संत नरहरी सोनार, संत गाडगे महाराज परिट, संत रविदास महाराज चांभार, संत जनागडे तेली या सर्वांना असे जातीत विभाजन करणे काही योग्य नाही. वारी सारख्या महान परंपरेवर काही धर्मांध लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ही घुसखोरी हाणून पाडली. या पुढील काळात देखील ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही अशी आक्रमणे परतून लावाल.

ज्ञानेश्वरांनी वैश्विक विचार मांडला…

मंत्री भुजबळ म्हणाले की, ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार – प्रचार अधिक व्यापक स्वरूपात केला. आपल्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ, अभंग, विरहीन्या इत्यादी चिंतनशील रचनांमधून व प्रत्यक्ष आचरणातून त्यांना लोकांच्या मनात विवेकाची ज्योत जागृत केली. पसायदानाच्या रूपाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश त्यांनी महाराष्ट्रातील घराघरांत पोचवला. भारतीय परंपरेतील विविध विचारधारा, जाती, वर्ण, पंथ आणि संप्रदाय एकत्रित आणून “हे विश्वची माझे घर’ हा नवा वैश्विक विचार जगापुढे मांडला. धर्माच्या आणि प्रांतांच्याही सीमा या विचारांनी मोडून काढल्या.

ज्ञानदेवांनी तत्वज्ञान सोपे केले

भुजबळ म्हणाले की, ज्ञानदेवांचा हा वैश्विक विचार “वसुधैव कुटुंबकम्’ या मूळ भारतीय वेदपरंपरेशी जोडणारा होता. जनसामान्यांच्या मनात हा विचार रुजवण्यासाठी भक्तांची मांदियाळी सोबत घेऊन अवघा मुलूख ज्ञानदेवांनी पालथा घातला. आपल्या सवंगड्यांसह पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेले ज्ञानेश्वर लोकांनी पाहिले, तेव्हा गावोगावचे लोक या दिंडीत सहभागी होऊ लागले. मंदिराच्या बंदिस्त गाभाऱ्यात नव्हे, तर शेताच्या बांधावर बसून द्वैत, अद्वैत सिद्धांत आणि कूट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल, अशा सोप्या मराठी भाषेत सहजपणे समजावून सांगणारा हा गोजिरवाणा बाळ अवघ्या मराठी मुलखाला आपला वाटला आणि मग श्री ज्ञानोबांच्या दिंडीत अवघा समाज लोटला.

ज्ञानदेवांची दिंडी परिवर्तनाची…

ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही पंढरपूरची वारी होती. परंतु, श्री ज्ञानदेवांनी आपल्या सवंगड्यांसह काढलेली पायी दिंडी ही परिवर्तनाची नांदी होती. ज्या काळात श्री ज्ञानेश्वरांनी हे विचार रुजवले, तो काळ पाहता त्यांचे कार्य फार अलौकिक असे कार्य होते. यातूनच वारकरी संप्रदायाचा हा वाढीस लागला. पुढे नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्राच्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अभिजात दर्जामुळे वाड्मयाच्या अभ्यासाला सुद्धा मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्ञानेश्वर महाराज विश्वाचे गुरू

भुजबळ म्हणाले की, विठ्ठल भक्तीचा प्रसाद म्हणजे प्रेम आणि प्रेम हीच श्री विठ्ठल भक्तीची शिदोरी आणि हीच शिदोरी घेऊन तुम्ही अनेक वर्ष ही वारी करत आहात. समाजाचे प्रबोधन करत आहात. आपल्यातले अनेक वारकऱ्यांनी वयाची पासष्ठी तर अनेकांनी पंच्याहत्तरी ओलांडली आहे. पण जेंव्हा वारी निघते वयाचा विसर पडून सर्वच वारकरी त्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातात. विठ्ठलाच्या रूपाचा नवा अविष्कार सांगणारे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान लोकांना अचंबित करणारे आहे. या चराचर विश्वावर प्रेम करण्याची शिकवण देणाऱ्या संप्रदायाचे श्री ज्ञानेश्वर हे पाया आणि श्री तुकाराम हे कळस आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या सुप्रसिद्ध अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली आहे. हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण पै जाहला ॥ असे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर महाराज या विश्वाचे गुरू झाले. खरेतर संपूर्ण विश्वाला कवेत घेऊ पाहणारी ही संकल्पना आहे. भारतामध्ये संपूर्ण विश्व हे आपल्या घरात सारखे आहे आणि विश्वातील सर्व जीवमात्र हे आपले बांधव आहेत. ही भावना भारतामध्ये वारकरी संप्रदायाने रुजवली. ज्या संप्रदायाचे आपण सर्व पाईक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें