Ajit Pawar | पुणे पालकमंत्रीपदावरुन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये धुसफूस? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं
पुण्यात पालकमंत्रीपदावरुन सत्ताधारी पक्षांमध्येच धुसफूस असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. विशेष म्हणजे नुकतंच 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार? याबाबतची मंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर या चर्चांना जास्त उधाण आलं. अखेर यावर अजित पवार यांनी जाहीरपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन युतीत रस्सीखेच सुरु असल्याची बातमी वारंवार समोर येत आहे. सध्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पालकमंत्रीपद हवं असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे, अशी चर्चा वारंवार समोर येते. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून नुकतंच पुण्यात 15 ऑगस्टला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोण झेंडावंदन करणार याबाबतची यादी जाहीर करण्यात आली होती.
नियमाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात झेंडावंदन करतात. पण पालकमंत्रीपदाबाबत अद्याप पूर्ण निर्णय न झाल्याने राज्य सरकारकडून झेंडावंदनसाठी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पहिल्या यादीत पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील झेंडावंदन करतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण नंतर ही यादी बदलवण्यात आली. यावरुन पुन्हा पुण्यात पालकमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
अजित पवार यांचा पत्रकारांना टोला
अखेर या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात चांदणी चौकात उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना अजित पवार यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांनाही टोला लगावला. “आमच्या इथल्या काही पत्रकार मित्रांना हेही माहिती नसतं की, पुण्यात 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करतं. पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल हे 15 ऑगस्टला झेंडावंदन करतात. तरी यांना खुमखुमी काय? चंद्रकांत पाटील करणार की राज्यपाल करणार? अरे तुम्हाला काय घेणंदेणं आहे? बातम्या नाहीत तर काहीही बातम्या काढता का?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.
“राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात झेंडावंदन करतात. पुण्यात स्वातंत्र्यदिनी राज्यपाल झेंडावंदन करतात. राज्यपाल 26 जानेवारीला मुंबईत शिवाजी पार्कात करतात. अशी ही पद्धत आहे. उगीच लोकांच्या मनात गैरसमज करु नका. माहिती नसेल तर माहिती घ्या. मग बातम्या द्या. राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये कुणाला कुठे पाठवायचं हा त्यांना अधिकार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदावर कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं.
‘मुख्यमंत्रीपदावर डोळा नाही’, अजित पवार यांचं स्पष्टीकरण
“एकाला वाटतं की या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या एका खुर्चीवर डोळा आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा ठेवून कसं चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना?” असे सवाल अजित पवार यांनी केले. “मुख्यमंत्रीपदावर व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरंतर काढायचं नव्हतं. पण काय होतं, आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही”, असं अजित पवार म्हणाले.
