शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या पक्ष प्रवेशावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह का? दोन मोठ्या भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक
शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या पक्ष प्रवेशावरुन भाजपमध्ये अंतर्गत वाद झाल्याची माहिती आहे. यात एक केंद्रीय मंत्री आहे आणि दुसरा आमदार. महाराष्ट्रात सध्या अनेक पक्षांमध्ये पक्ष प्रवेश आणि पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कार्यक्रम सुरु आहेत.

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. अनेक पक्षांमध्ये पक्ष प्रवेश आणि पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. महायुती सत्तेवर असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा ओढा अधिक आहे. आता पुण्यात एका पक्ष प्रवेशावरुन भाजपमध्ये अंतर्गत वाद झाल्याचं वृत्त आहे. सचिन दोडके यांच्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत वादावादी झाली. पुण्यात सचिन दोडके यांचे भाजप प्रवेशाचे फ्लेक्स लागले आहेत. दोडकेंवरुन पुण्यातील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली अशी बातमी आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्या पक्ष प्रवेशावरून वाद झाल्याची माहिती आहे. सचिन दोडके हे वारजेमधील माजी नगरसेवक आहेत. भीमराव तापकीर यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याची माहिती आहे. भीमराव तापकीर यांचा विरोध असू शकतो, कारण सचिन दोडके यांनी दोनवेळा त्यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली आहे. खडकवासला हा भीमराव तापकीर यांचा मतदारसंघ आहे. ते सलग चारवेळा या भागातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. खडकवासलामधून भीमराव तापकीर यांनी 2019 आणि 2024 असा दोनवेळा सचिन दोडके यांचा पराभव केला आहे. भविष्यात सचिन दोडके यांच्या रुपाने खडकवासलामध्ये भाजपकडे पर्याय येईल ही भिती त्यामागे आहे.
अजित पवार यांना धक्का बसणार का?
सचिन दोडके वारजे भागातून अनेक वर्ष नगरसेवक आहेत. ते सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. 2024 मध्ये खडकवासल्यामधून त्यांच्या हमखास विजयाची शक्यता होती. पण त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान दुसरी बातमी अशी आहे की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. प्रदीप गारडकर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इंदापूर नगराध्यक्ष पदाची अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली होती. प्रदीप गारडकर यांची भाजपा प्रवेशाच्या अनुषंगाने मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
