भीमाशंकर परिसरात पावसाचा हाहाकार, नदी नाल्यांना पूर, पाणी गावात शिरलं
यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, भीमाशंकर परिसराला पावसाचा मोठा फटका बसला असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. पाणी गावात शिरलं आहे.

महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका बसला आहे, यंदा मे महिन्यातच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या भीमाशंकर परिसरात कोसळधार पाऊस सुरू आहे. भीमाशंकर परिसरात पावसानं कहर केला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूसह धान्य भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे.
भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीवरील बंधाऱ्यांचे डाफे वेळेवर न उघडल्यामुळे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. यामुळे शेतीसह घरात पाणी शिरून मोठ नुकसान झाले, तर जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भातासाठी तयार केलेली भात खाचरं पूर्णपणे नष्ट झाले आहे. पाण्याने खाचरं वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेतातील घरे आणि जनावरांचे गोठेही पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला असला तरी त्याचे परिणाम भीषण आहेत. सध्या हवामान स्थिर असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिरूर तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका
दरम्यान दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कोसळणारा पाऊस यंदा मे महिन्यातच कोसळत आहे. तालुक्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, विहिरी देखील भरल्या आहेत, बोरवेलमधून पाणी बाहेर आलं आहे.
पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे, चिंता वाढवणारी बातमी म्हणजे पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 27, 28 आणि 29 मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
