मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त, धबधब्यांमधील दगडधोंडे खाचरात

Maval Rain | मावळ भागात मुसळधार पावसामुळे धबधब्यांना यंदा पाचपट जास्त पाणी आल्याने डोंगर दऱ्याखोऱ्यातील माती दगड मोठ्या प्रमाणात वाहून आली. त्यामुळे भात खाचरांवर पूर्णपणे गाळ साचला आहे.

मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त, धबधब्यांमधील दगडधोंडे खाचरात
मावळमधील भातशेती उद्ध्वस्त

पुणे: मावळ तालुक्याला भात पिकाचे आगार म्हटले जाते. तालुक्यात 12 हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर भात पिकाची शेती केली जाते. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मावळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अंदर मावळ तसेच पवन मावळ या दोन्ही पट्ट्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते.

या भागात पावसाचे प्रमान जास्त असल्याने प्रामुख्याने मावळ भागातील शेतकरी हा भात पीक घेत असतो. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकरी हतबल झालाय. मावळ भागात मुसळधार पावसामुळे धबधब्यांना यंदा पाचपट जास्त पाणी आल्याने डोंगर दऱ्याखोऱ्यातील माती दगड मोठ्या प्रमाणात वाहून आली. त्यामुळे भात खाचरांवर पूर्णपणे गाळ साचला आहे. परिणामी भात पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा भात पिकाचे उत्पन्न देखील घटणार आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला होता. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके आणि काही प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याची अंतिम कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI