सदाभाऊ खोत यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली; ताफा अडवल्यानंतर सरकारकडून सुरक्षा पुरवली; गृहमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
सदाभाऊ खोत यांचे हे हॉटेल नाट्य सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. हॉटेल मालकाने आडवल्यानंतर काही वेळातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची सुरक्षा वाढवण्याचे अश्वासन दिले होते.

मुंबईः राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. या सर्व राजकीय घडामोडी घडत असतानाच राजकारणातील काही लोकप्रतिनिधी विविध कारणांमुळे चर्चेत येत असतात. हनुमान चालीसाचे प्रकरण राज्यात तापल्या नंतर खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तात्काळ वाढ करण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याही सुरक्षेत वाढ (Increased security) होत असून त्यांच्याही सुरक्षेत आजपासून वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सांगोल्यातील मामाभाचे हॉटेलवर (Mamabhache Hotel) सदाभाऊ खोत आणि त्यांचे कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी मामाभाचे हॉटेल मालकाने 2014 मधील हॉटेलची उधारी मागत त्यांचा ताफा अडवून धरला होता.
त्यामुळे सदाभाऊ खोत चर्चेत आले होते. त्याबाबतच व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
हॉटेल मालकाने जूनी उधारी मागितली
माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना रस्त्यात अडवून हॉटेल मालकाने जूनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदाभाऊ खोत चर्चेत आले. यावेळी 2014 सालापासून उधारी दिली नसल्याचे सांगत संतप्त हॉटेल मालकाकडून सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनीही पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकावरही आरोप केले होते.
आजपासूनच सुरक्षा व्यवस्था पुरवणार
सदाभाऊ खोत यांचे हे हॉटेल नाट्य सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. हॉटेल मालकाने आडवल्यानंतर काही वेळातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची सुरक्षा वाढवण्याचे अश्वासन दिले होते.त्यानुसार सदाभाऊ खोत यांना आज आजपासूनच सुरक्षा व्यवस्था पुरवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदाभाऊंसह कार्यकर्त्यांना अडविले
सदाभाऊ खोत आणि त्यांचे कार्यकर्ते सांगोला दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांचा ताफा अडवल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
