पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, मेधा कुलकर्णींची मोठी मागणी!
भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप केला होता. या बँकेत अनेकांच्या नावावर खोटे कर्ज दाखवण्यात आले आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच अनेक ठेवीदार मला भेटत आहेत. ठेवीदारांच्या 25-25 वर्षापासून या बँकेत ठेवीदारांच्या ठेवी आहेत, त्या पैशांची हमी नाही. लोकांना पैसे मिळवण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत, असा मोठा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांनी मोठी मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला नामांतर करण्यात यावं या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
पुणे रेल्वे स्थानकाची डागडुजी करणे फार महत्त्वाचं आहे. पुणे स्थानकाच्या आवारात या शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. या स्थानकाची डागडुजी करत असताना हा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे. सगळ्या देशातील वेगवेगेळी रेल्वे स्थानकं, विमानतळं या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा. हीच मागणी मी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्यायला हवं, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली.
थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आहे आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अटक ते कटक इथपर्यंत साम्राज्य नेलं. याचं प्रतिक हे शनिवारवाडा आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी मी केली आहे, अशी माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिलीय.
दरम्यान, पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या मागणमुळे आता पुण्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यामुले आता या मागणीनंतर काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
