Pune MPSC Student Protest LIVE | राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थी संतप्त, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. Pune MPSC Students Protest

Pune MPSC Student Protest LIVE | राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थी संतप्त, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन
MPSC चे विद्यार्थी संतप्त

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे. (Maharashtra MPSC exam postponed State Service Preliminary examinations Pune MPSC Students Protest angry  over which held on 14 march)

कोरोनाचं कारण देत परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर रस्त्यावर झोपले

यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. 14 तारखेला होणारी परीक्षा झाली पाहिजे. एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

सत्यजीत तांबेंचे सरकारला निर्णय मागं घेण्याचं आवाहन

काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करतो, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. अचनाकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे, असा सवाल तांबे यांनी केला. त्या निर्णयावर तातडीनं फेरविचार करा, असं आवाहन तांबे यांनी केलं आहे.

सरकारचं नियोजन चुकलं: प्रविण दरेकर

राज्य शासनाचं नियोजन चुकलं आहे. सरकारनं नियोजन करायला पाहिजे. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र थांबला नाही, थांबनार नाही हे सांगून चालणार नाही त्यावर मार्ग काढा, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढवा: चंद्रकांत पाटील

MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. या सरकार मध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी २ ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो.त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मी मागणी करतो, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.

आपण एमपीएससीच्या परीक्षा अनंत काळासाठी पुढे ढकलू शकत नाही. वय निघून जातं, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या व्हायला हव्यात, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, या परीक्षा चारवेळा पुढे ढकलल्या आहेत , असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानंतर निर्णय

14 मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे परीक्षा पुढे ढकलेल्या

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.

संबंधित बातम्या:

MPSC Preliminary Exam | मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

(Pune Students angry over MPSC postpone State Service Preliminary examinations which held on 14 march)

Published On - 3:11 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI