भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार; काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दावा केला आहे की भाजप राहुल गांधींना घाबरले आहे, म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमांना विरोध करत आहे. भाजप महाराष्ट्रात सत्ता गमावणार आहे कारण लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान असून, भाजप आता शेवटचे हातपाय हलवत आहे. पटोले यांनी भाजपवर हुकूमशाहीचा आरोप करत, त्यांची सत्ता लवकरच संपुष्टात येईल असे म्हटले आहे.

भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार; काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 11:31 AM

भाजपचे लोक राहुल गांधींना घाबरत आहेत. त्यांच्या मनात राहुल गांधींबद्दलची भीती आहे. त्यामुळेच ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांना विरोध करत आहेत. तीन राज्यात पाहिलं. आता महाराष्ट्रातही तेच घडत आहे. खरे तर भाजपची सत्ता जाणार आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळेच भाजपचे लोक शेवटचे हातपाय हलवण्याचं काम करत आहे, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना पटोले यांनी हा दावा केला आहे.

काल एनएसयूच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. याचा अर्थ भाजपवाले राहुल गांधींना घाबरले आहेत. कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे. भाजपच्या मनात भयभीतपणा दिसत आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात राहुल गांधींनी रणशिंग पुकारलं आहे. राहुल गांधींच्या सोबत तरुण आहेत, असं सांगतानाच भाजप शेवटचे हातपाय हलवत आहे. भाजपचं सरकार जाणार आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, हे भाजपला कळून चुकलं आहे. भाजप सत्तेत राहिल्यावर देशाची संवैधानिक व्यवस्था संपुष्टात येईल असं तरुणांना आणि शेतकऱ्यांना वाटत आहे. भाजपबद्दलची चीड लोकांच्या मनात आहे, असं नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान

राहुल गांधी हे माझेच नेते आहेत असं नाही. ते देशाचे नेते आहेत. राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. राहुल गांधी ज्या ज्या राज्यात छात्रो की गुंज कार्यक्रम करतात तिथे भाजपच्या सत्ताधीशांना त्रास होतोय. तीन राज्यात हेच झालं. हे चौथं राज्य आहे. महाराष्ट्र हे समाजिक न्यायाचं राज्य आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे. इथूनच स्त्री शिक्षणाला सुरवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचे द्वारे उघडण्याचं काम याच पुण्यातून केलं. त्याच पुण्यात राहुल गांधींचा कार्यक्रम फेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं पटोले यांनी म्हटलं.

भाजप राहुल गांधींना घाबरली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परमिशन देताना 30 नियम लावले. आधी जमावबंदी लावली. यावरून भाजपला राहुल गांधींची भीती वाटते हे स्पष्ट होतंय. राहुल गांधींना भाजप घाबरली आहे. अमित शाह महिन्यातून दोनदा महाराष्ट्रात येतात. त्यांना अटी लागत नाही. मोदींच्या कार्यक्रमाला अटी लागत नाही. जमावबंदी लागू होत नाही. आणि राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते असूनही त्यांच्या कार्यक्रमाला अटी लावल्या जातात. याचाच अर्थ भाजप त्यांना किती घाबरते हे दिसतंय, असं ते म्हणाले.

ही हुकूमशाही आहे

पुण्यात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांचं आयुष्य बरबाद करणं, काही मुलं कोणत्याच पक्षाचे नव्हते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अभाविपच्या लोकांवर गुन्हे दाखल केले नाही. ही हुकूमशाही आहे. जेपी नड्डांना सांगायचं जंतरमंतरवर मुलांवर पॅलेट गन चालवल्या त्याचं उत्तर का देत नाही? राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले त्यावर का बोलत नाही? मोदी शाह संसदेत का येत नाहीत? भाजपचे नेते भीती युक्त स्टेटमेंट करत आहेत. राहुल गांधी यांच्याबद्दलची भीती मनात आहे. सत्ता जातेय असं वाटतंय त्यांना. लोकं आपल्या विरोधात जातेय हे त्यांना कळलंय. म्हणून ते असं करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

दूध का दूध, पानी का पानी होईल

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पैसे देऊन तरुणांना आणलं जात असल्याचा भाजपने आरोप केला. भाजपचा हा आरोप पटोले यांनी फेटाळून लावला आहे. पैसे देऊन लोकं जमा करायचे हे भाजपचं पेटंट आहे. मोदी शाह यांच्या सभेत तेच केलं जातं. जेवणाची व्यवस्था केली जाते, पैसे दिले जातात. त्यांना ती सवय लागली. त्यांची सवय हे काँग्रेसवर टाकू पाहत आहेत. आज कार्यक्रम आहे. जेनजी येणार आहेत. त्यांना विचारा. पैसे देऊन आला की स्वत:हून आला. दूध का दूध पानी का पानी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us