Ajit Pawar : ‘तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या…’, अजित पवारांनी विकासकाला थेट सुनावलं
Ajit Pawar : अजित पवार यांनी आज हिंजवडी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार यांनी एकाठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. स्वत: अजित पवारांनी आज तिथे जाऊन आदेशाची अमलबजावणी होतेय की नाही याची पाहणी केली आणि विकासकालाही सुनावलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दररोज सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. अजित पवार हे स्वत: वक्तशीर वेळ पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते सकाळी लवकर उठून बारामती किंवा पुणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील विकासकामांची पाहणी करतात, सूचना देतात. आज सकाळी अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली.
‘कोणालाही कामात येऊ देऊ नका’ अशी अजित पवारांनी तंबी दिली. कोणी आडवं आलं, तरी समजावून सांगणार असं अजित पवारांनी म्हटलय. अजित पवार जरी मध्ये आले, तरी 353 टाका असं अजित पवार म्हणाले. “आपलं असं ठरलय की कुणीही मध्ये आलं तरी 353 टाकायचं. कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 टाका. 353 लावल्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा आणि माझं ते करा सुरु राहिलं. ते आपल्याला होऊ द्यायच नाही. एकदाच संपूर्ण कामच करुन टाकायचय” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाची पाहणी
अजित पवार यांनी ओढ्यावरील अनधिकृत भाजी मंडई पाडकामाची पाहणी केली. हिंजवडी जवळील माण ग्रामपंचायत जवळ ओढ्यावर ग्रामपंचायतीकडून भाजी मंडई उभारण्याचे काम हाती घेतले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची पाहणी केल्यानंतर या नाल्यावरील हे बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून भाजी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच नाल्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.
अजित पवार यांनी विकासकाला झापलं
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते. बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेली. तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची व्हय असं थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावलं आहे.
