
Pimpri Chinchwad Municipal Corporation elections 2026: राज्यातील अनेक ठिकाणी तिकीट कापल्याने उमेदवारांची रडारड संपूर्ण देशाने पाहिली. हट्टाला, ईरेला पेटलेल्या उमेदवारांची समजूत घालताना पक्षश्रेष्ठींच्याही नाकीनऊ आल्याचे दिसून आले. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमं त्र्यांना या बंडोबांना शांत करण्यासाठी फोन करावा लागला. पक्ष श्रेष्ठींनी त्यांना भविष्यात काही तर लाभ देण्याचे आश्वासन दिले. पण दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन उमेदवार अत्यंत भाग्यवंत ठरले आहेत. कारण त्यांना एका नव्हे तर दोन पक्षांनी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी त्यांनी एबी फॉर्म सुद्धा दिला आहे.
एकाच जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ जागेवर हा पेच निर्माण झालाय. नीलम म्हात्रे यांना प्रभाग 20 मधील ब जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले आहे.तसेच संदीप गायकवाड यांना प्रभाग 30 मधील ‘अ’ जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेनं ही एबी फॉर्म घेतले.
आता या दोघांनी एकाचं पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र या दोघांनी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म दाखल केले आणि छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरलेत. त्यावेळी या दोघांकडे एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची वेळ होती. मात्र या दोघांनी ती प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळं या दोघांकडे अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा पर्याय असेल.
सोलापूरात निष्ठावंत कार्यकर्त्याला भर सभेत रडू कोसळलं
सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावल्याचे पडसाद दिसून येत आहे. या प्रकरामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. तिकीट कापल्यानंतर भाजप कार्यकर्त्याला भर सभेत अश्रू अनावर झाले. पण आता या उमेदवाराने पक्षाविरोधातच शड्डू ठोकले आहेत. राजकुमार आलूरे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. राजूकुमार आलूरे हे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जातात. प्रभाग ५-ड मधून त्यांची उमेदवारी डावलली गेली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या बिज्जू प्रधाने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष दिसून आला. काल रात्री बाळे परिसरात प्रभाग ५ मधील बैठक पार पडली. बैठकीत आलूरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर भाजपकडून बंडखोरांना उमेदवारी मागे न घेतल्यास पक्ष शिस्तंभग केल्याप्रकरणात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.