वीकेंड साजरा करण्यासाठी जाताना या ठिकाणी जाऊ नका, कारण लागू केले प्रतिबंधात्मक आदेश
Ghat Waterfall : शनिवार, रविवार आले की वर्षा पर्यंटनासाठी अनेक जणांची पावले बाहेर पडत आहेत. धबधबे अन् दऱ्याखोऱ्यांमध्ये गर्दी होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी वाहतूक ठप्प होत आहेत.
![वीकेंड साजरा करण्यासाठी जाताना या ठिकाणी जाऊ नका, कारण लागू केले प्रतिबंधात्मक आदेश वीकेंड साजरा करण्यासाठी जाताना या ठिकाणी जाऊ नका, कारण लागू केले प्रतिबंधात्मक आदेश](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/20220943/Capture-60.jpg?w=1280)
प्रदीप कापसे, पुणे | 20 जुलै 2023 : मुंबई, पुणे, नाशिक परिसरात वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पुणे अन् मुंबई शहरातील लोक या ठिकाणी गर्दी करतात. शनिवार, रविवारी लोणावळा, खंडाळा, इगतपुरीसह इतर ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांत धबधबे अन् दऱ्या खोऱ्यांमध्ये दुर्घटनाही घडल्या आहेत. नियमांचे पालन न करणे, स्टंट करणे यामुळे मृत्यू झाले आहेत. यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. पर्यटनासाठी जाण्यासाठी या ठिकाणी बंदी घातली आहे.
कुठे आणली बंदी
वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गाव आहे. निसर्ग सौदर्याने नटलेले हे गाव आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असलेला मढे घाट धबधबा पाहण्यासाठी चांगली गर्दी होत असते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना धबधब्यामध्ये दोरखंडाद्वारे खाली सोडण्यात येते. परंतु या ठिकाणी येण्यास पुढील ६० दिवस प्रतिबंध घालण्यात आली आहे. भोर येथील उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी हे आदेश काढले आहे.
का घातली बंदी
मढे घाटचा परिसर पर्जन्यमानाचा आहे. या ठिकाणी असलेल्या धबधब्यामध्ये काही जण पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये लोकांना सोडतात. अगदी खाली २०० ते ३०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडले जाते. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. यामुळे धबधब्याच्या ठिकाणी ६० दिवसांसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/13003240/Tomato-Cover-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/20181012/16.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/20170741/New-Project-2-4.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/17190922/New-Project-17.jpg)
…तर गुन्हा दाखल होणार
मढे घाट परिसरात बंदीचाा आदेश लागू केला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भारतीय दंड संहिता १९०८ कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील काही पर्यटन स्थळावर मागील आठ, पंधरा दिवसांपूर्वी दुर्घटना घडल्या होत्या. लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत मुंबई येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी दहा जण पोहण्यास गेले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.