पुण्यात कोरोना संसर्ग वाढतोय, प्रशासनाची तयारी काय ?, जाणून घ्या सध्याची परिस्थिती

पुण्यात आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून वेगवेगळ्या उपायोजनांची तयारी केली जात आहे. (pune corona patient corporation)

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 8:37 AM, 21 Feb 2021
पुण्यात कोरोना संसर्ग वाढतोय, प्रशासनाची तयारी काय ?, जाणून घ्या सध्याची परिस्थिती
पुणे महानगरपालिका आणि कोरोना विषाणू

पुणे : पुण्यात कोरोना (Pune corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशासन तयारीला लागले आहे. आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे. नव्या योजनेनुसार कोरोना रुग्ण आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे आरोग्य विभागाने ठरवले आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. (pune  corona patient increased  corporation prepares itself to stop corona)

प्रशासनाची तयारी काय?

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढते आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा वाढत्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स तसेच इतर उपकरणं उपलब्ध करुन  दिले आहेत. तसेच महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक टीममध्ये आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

रविवारीसुद्धा चाचणी केंद्र सरु

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या मदतीनेच कोरोनाला थोपवता येऊ शकते. त्यामुळे पुणे महापालिकेने रविवारीसुद्धा कोरोना चाचणी केंद्रे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेची 17 कोरोना चाचणी केंद्रे रविवारी सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात आणखी तीन ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाने आपली तयारी सरु केली आहे. बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर पुन्हा एकदा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात खासगी रुग्णालयाच्या खाटा ताब्यात घेण्यास पालिका सुरुवात करणार आहे. पुणे माहनगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयांना तसे पत्रं पाठवली आहेत. कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता उपचारासाठी खाटा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना रुग्णांची स्थिती काय?

पुण्यात 17 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 428 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढून 465 नवे रुग्ण आढळले होते. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 527 रुग्ण आढळले होते. म्हणजेच मागील काही दिवसांचा अभ्यास केला, तर पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या पुण्यात 2561 जणांवर उपचार सुरु आहे. यापैकी 160 जण व्हेंटिलेटरवर असून काल दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात काल 414 नवे कोरोना रुग्ण आढळले होते.

इतर बातम्या :

पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का?, पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली