घरी जात असतानाच घात झाला… हेल्मेट चिरून… त्या दोन घटनांनी पुणे हादरलं
पुण्यात नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. औंध आणि येरवडा येथे नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. बंदी असतानाही शहरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू असून, नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हेल्मेट असूनही गंभीर दुखापत झाल्याने मांजाचा जीवघेणा वापर थांबवणे आवश्यक आहे.

बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री आणि वापर शहरात सर्रास सुरू असतो, मात्र त्यामुळे लोकांच्या जीवावर बेतू शकतं. असंच काहीस पुण्यात घडलं. कामावरून दुचाकीवरून घरी जात असताना नॉयलॉन मांजा गळ्याला आणि हाताला लागून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना औंध- बाणेर रस्त्यावर कस्तुरबा वसाहतीजवळ घडली. एवढचं नव्हे तर येरवडा परिसरात आणखी एका घटनेत नायलॉन मांजामुळे आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
आदित्य गौड (वय 34, रा. औंध) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य हे १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास औंध- बाणेर रस्त्याने दुचाकीवरून घरी निघाले होते. कस्तुरबा वसाहतीजवळ अचानक रस्त्यावर नॉयलॉन मांजाने त्यांच्या गळ्याला जखम झाली. गळ्याला मांजा लागताच स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी मांजा हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे हातालाही गंभीर जखम झाली.
हेल्मेट असूनही पूर्ण चेहऱ्याला गुंडाळला गेला नायलॉन मांजा आणि..
तर दुसऱ्या घटनेत जखमी झालेल्या इसमाचे नाव अमृत लोखंडे (वय 35, रा. विश्रांतवाडी) असे आहे. या दुचाकीस्वार तरुणालाही नॉयलॉन मांजा लागल्याने चेहऱ्याला गंभीर जखम झाली. ही घटना येरवडा परिसरात सादलबाबा दर्गा रस्त्यावर नुकतीच घडली. हेल्मेट असूनही नायलॉन मांजा पूर्ण चेहऱ्याला गुंडाळला गेला. मांजाने हेल्मेट चिरून डाव्या डोळ्याला, हाताच्या अंगठ्याला जखम झाली. परंतु सुदैाने हेल्मेटमुळे जीव वाचला, असे लोखंडे यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात नायलॉन मांजावर बंदी असतानाही मांजाची खुलेआम विक्री सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होत असली, तरी ती अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि पतंगोत्सवाच्या दिवसांत नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्षी मोठ्या प्रमाणावर जखमी होत आहेत. या घटनेनंतर नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पतंगाच्या नादात 10 वर्षीय मुलाचा उघड्या विहिरीत पडून मृत्यू !
अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर येथे पतंग पकडण्याच्या नादात 10 वर्षीय शेख उमेर शेख फकीरा या चिमुकल्याचा उघड्या आणि कटघरे नसलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जुनी वस्ती परिसरातील प्रजापती लेआउट येथे काल सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. सुमारे 65 फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीत उमेर कोसळला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी प्रयत्न करत रात्रीच्या सुमारास उमेरला बाहेर काढले पण तोपर्यंत उशीर झाला होता. विशेष म्हणजे याच विहिरीत यापूर्वीही अपघात होऊनसुद्धा प्रशासनाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
