Malegaon MC Election: मालेगावात काँग्रेसचा हाबाडा, शिंदेसेनेसह ओवेसीला दाखवले अस्मान; इस्लाम पार्टीला हाताशी घेत मोठी खेळी
Congress Islam Party: मालेगावात भाजपला एकामागून एक झटके बसत आहेत. मालेगाव महापालिकेत भाजपचा धुव्वा उडाला. तर आता काँग्रेसने ओवेसींच्या AIMIM लाच नाही तर शिंदेसेनेच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला सुरुंग लावला आहे. इस्लाम पार्टीला हाताशी धरत असा डाव टाकला आहे.

Islam Party and AIMIM: मालेगाव महापालिकेत भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला मोठा झटका बसला आहे. तर आता काँग्रेसने शिंदेसेनाच नाही तर एमआयएमला हाबाडा दिला आहे. मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने इस्लाम पार्टीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून एकूण संख्या 43 झाली असून बहुमत पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग इस्लाम पार्टीसाठी मोकळा झाला आहे.
काँग्रेसने कोंडी फोडली
मालेगाव महापालिकेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तर इस्लाम पक्षानं करिष्मा केला आहे. एमआयएमला हा पक्ष पर्याय म्हणून समोर आला आहे. इथं भाजपने मुसंडी मारण्याची पूर्ण तयारी केली होती. पण भाजपला खातं उघडता आलं नाही. दुसरीकडे एमआयएमला सत्तेची गणित जुळवून अद्यापही अवघड असल्याचे समोर येत आहे. शिंदेसेनेला सोबत घेऊन चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसने इथं डाव टाकला. काँग्रेसकडे अवघ्या 3 जागा असतानाही पक्षाने एमआयएमला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव टाकला आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठीची कोंडी फोडली आहे. तर आता समाजवादी पक्ष सुद्धा इस्लाम पार्टीच्या मदतीला धावला आहे. त्यामुळे बहुतमाचे गणित जुळले आहे.
मालेगावमध्ये पक्षीय बलाबल काय?
मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला 35 जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएमला 21 जागांवर विजय मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 जागा, समाजवादी पक्षाला 6, काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इस्लाम पक्षाला आठ नगरसेवकांची गरज होती. समाजवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने हा आकडा पूर्ण झाला आहे. आता नवीन आघाडीच्या नगरसेवकांची संख्या 43 इतकी झाली आहे.
तर एमआयएमशी इस्लाम पार्टीची चर्चा
दरम्यान, इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळाने एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली आहे. दोन्ही पक्षात साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते. एमआयएम स्वतंत्र ताकद लावणार की काँग्रेससह इस्लाम पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण सत्तेच्या चाव्या या इस्लाम पार्टीकडे असल्याचे सध्या तरी दिसत आहे. तर गोटातील माहितीनुसार, शिंदे सेनेकडून एमआयएमला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव होता, पण आम्ही त्याला नकार दिल्याचा दावा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेला इथं सत्ता स्थापन करता येणार नाही.
