‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’, सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'चल रे खोक्या टुनुक टुनुक' असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

चल रे खोक्या टुनुक टुनुक, सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली
| Updated on: Jan 17, 2024 | 7:29 PM

रणजित जाधव, पुणे | 17 जानेवारी 2024 : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. “आम्ही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी यावेळी खिल्ली उडवली. “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सारवासारव परिषद घेतली. काल जी महापत्रकार परिषद झाली त्यानंतर 26 जानेवारीपासून राज्यस्तरीय दौरा आखला जाणार आहे. लवकरच सविस्तर माहिती देऊ”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. राहुल नार्वेकर गिरे तो भी टांग उपर असं समजत आहेत. ते खोट्याचं खरं करत आहेत. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम हे नेते क्रमांक एकवर होते. आता ते क्रमांक पाचवर गेले याचं वाईट वाटतं, असंदेखील अंधारे यावेळी म्हणाल्या.

“काल सगळं उघड झालंय. राहुल नार्वेकर यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. पक्षाची 2013 ला निवडणूक झाली, त्यांना 1999 ची घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते नाहीत, तसेच उपनेते देखील नाहीत. गजानन कीर्तिकर, रामदास साहेब हे मागे गेले शिंदे पुढे आले. सगळे AB फॉर्म तुम्ही अमान्य करणार का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

‘अमित शाह यांनी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवले?’

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीत तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवले? 70-72वर घरे घेणारे नेते त्यांच्याशी बोलणी का नाही गेली? 1999 साली तेव्हाच पक्ष का नाही गोठला? नोटीस का नाही पाठवली?”, असे देखील सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर आल्याचा दावा केला आहे. याबाबत सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भूमिका मांडली. “ऑफर सगळ्यांना येत राहतात. भाजप नेत्यामधील चाणक्य नेते घडवत असतात, महाराष्ट्र भाजप ज्याच्या हातात दिली आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी नेते घडवले नाही तर चोरले आहेत”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Follow Us