थलपति विजय यांच्यानंतर साऊथमधील मोठ्या सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री? भाषणातील वक्तव्यामुळे खळबळ
थलपति विजय यांच्यानंतर आणखी एका सर्वात मोठ्या सुपरस्टारची राजकारणात होणार एन्ट्री? सोशल मीडियावरील भाषणामुळे प्रचंड चर्चा. अनेकांनी दिल्या शुभेच्छा.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष याच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात त्याच्या फॅन क्लबच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि जनकल्याणाचे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर धनुषही अभिनेता थलपती विजय यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र, धनुषने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात धनुषने चाहत्यांना समाजोपयोगी कामांमध्ये अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. आपल्या परिसरातील गरजू कुटुंबांच्या गरजा समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन त्याने केले. यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना धनुष म्हणाला, ‘एका ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आहेत. या एकतेत मोठी ताकद आहे. मात्र, या एकतेला समाजहिताचे उद्दिष्ट मिळणे आवश्यक आहे.’
त्याने पुढे सांगितले की, ‘फक्त ऑडिओ लॉन्च किंवा चाहत्यांच्या भेटीगाठींपुरते मर्यादित राहू नका. समाजासाठी अधिकाधिक कल्याणकारी कामांमध्ये सहभागी व्हा. आपल्या परिसरातील लोकांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना शक्य तितकी मदत करा. तुम्ही अशी कामे कराल, याची मला खात्री आहे आणि त्यामुळे मला तुमचा आणखी अभिमान वाटेल’ असं तो म्हणलाा.
नव्या ध्वजाचे अनावरण, विजय यांच्याशी तुलना
या कार्यक्रमात धनुषने आपल्या फॅन क्लबच्या नव्या ध्वजाचेही अनावरण केले. यानंतर अनेकांनी त्याची तुलना अभिनेता आणि राजकारणी थलपती विजय यांच्याशी केली. विजय यांनीही अनेक वर्षे चाहतावर्गाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. त्यामुळे धनुषही त्याच मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर राजकीय प्रवेशाच्या चर्चा
धनुषच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्याचे राजकारणात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
या सर्व चर्चांदरम्यान धनुषने राजकारणात प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, तो अनेक वर्षांपासून आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहे. राज्यभरात रक्तदान शिबिरे, पूरग्रस्तांसाठी मदतकार्य तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य अशा विविध उपक्रमांमध्ये त्याच्या चाहतावर्गाचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
