..तर हा उद्रेक दिसेल, रुपाली ठोंबरे पाटील यांचा भाजपला इशारा
अशा मोर्चात जी लोकं येतात ही उत्स्फूर्तपणे येतात. शिंदे गटासारखे पैसे देऊन आणावे लागत नाहीत.

पुणे : मुळात सत्तेतील लोकांना महापुरुषांवर टीका करायला महाविकास आघाडीनं सांगितलं का, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. तुमची जिभ घसरतेच कशी. सातत्यानं एक प्रवक्ता बोलल्यानंतर भाजपचे आलटून पालटून बोलतात कसे. त्यामुळं हा मुद्दा त्यांच्यासाठी गौण असेल. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य सहन करणार नाही. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य सहन करणार नाही. महापुरुषांबद्दलची बेताल वक्तव्य बंद झाली पाहिजेत. म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्याच्या नियोजनाबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. संपूर्ण राज्यातील लोकं येथे येतील. यापूर्वी पुण्यातला मोर्चा यशस्वी झाला. तो पुण्यापर्यंत मर्यादित होता. हा संपूर्ण महाराष्ट्राचा मोर्चा आहे.
अशा मोर्चात जी लोकं येतात ही उत्स्फूर्तपणे येतात. शिंदे गटासारखे पैसे देऊन आणावे लागत नाहीत. या तुफान गर्दीचा अर्थ भाजपनं लक्षात घ्यावं. भाजपनं बेताल वक्तव्य बंद करावीत, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील बेरोजगारी, शिक्षण, थांबलेले प्रकल्प यावर तुम्ही काम कराना. काम करत नाही. विनाकारण राज्याच्या राजकारणात बेताल वक्तव्य करता, अशी टीकाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
एक बाई तुमच्यावर बोलते म्हटल्यावर कुठलीतरी डुप्लिकेट बाई उभी करायची. महिलांची इज्जत काढून हासत खेळत बसायचं, असं सरकार नसतं हो, असंही त्यांनी राज्य सरकारला सुनावलं.
सुषमा अंधारे पाच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात आल्यात. ज्यावेळी सुषमा अंधारे यांची भाषणं झालीत त्यावेळी वारकरी समाज कुठं होता. सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा भंडाफोड केलाय. त्यामुळं वारकरी संप्रदायातील काहींना शिंदे गटानं भडकवलं, असल्याचंही त्या म्हणाल्या.
