उभ्या आयुष्यात रक्ताची बाटली कधी यांनी दिली नाही कुणाला आणि त्यांना आमदार करायचं..पुण्यात निकालाआधी शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याची आगपाखड
"अशा लोकांना का मतदान करायचं, तो पक्ष कुठला का असेना.शिक्षकांमधला शिक्षक आमदार झाला पाहिजे. कार्यकर्त्यांचा विजय झाला पाहिजे. पुण्यात लोकशाहीचा विजय होईल. चोरांना बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे"

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल आहे. पुण्याच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. शिंदे शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. या निकालाआधी एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “आज खरंतर लोकशाहीचा विजय होईल. विचारांची देवाण-घेवाण करणारे नागरिक आहेत, विचारपूर्वकच मतदान केलं असेल. कोटी रुपये, लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आपण ऐकतोय. आजचा निकाल हा शिक्षक आणि पदवीधरांच्या बाजूने लागेल” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. पुण्यात पदवीधरमध्ये भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. “समाजाचं आणि या कुटुंबाचं काही देणंघेणं नाही. उभ्या आयुष्यात रक्ताची बाटली कधी यांनी दिली नाही कुणाला. आणि त्यांना आमदार करायचं हे लोकशाहीच्या हिताचं नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“अशा लोकांना का मतदान करायचं, तो पक्ष कुठला का असेना.शिक्षकांमधला शिक्षक आमदार झाला पाहिजे. कार्यकर्त्यांचा विजय झाला पाहिजे. पुण्यात लोकशाहीचा विजय होईल. चोरांना बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. “अदानी आणि अंबानी यांनी हा देश विकून खाल्ला आहे. देशाला चिरडण्याचं काम केलं आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे. निसर्गाची संपत्ती ज्यामुळे माणूस जिवंत राहणार आहे, झाड तोडून जर त्या ठिकाणी एखादा प्रकल्प केला जात असेल हे कितपत योग्य आहे. ही चिंतेची बाब आहे” असं रवींद्र धंगेकर वृक्षतोडीवर म्हणाले.
वृक्ष तोडलेच नाही पाहिजे वाढवले पाहिजेत
“वृक्ष तोडलेच नाही पाहिजे वाढवले पाहिजेत. बाकीच्या ठिकाणी प्रोजेक्टला जागा आहे.भाजपच्या घशात करोडो रुपयांची ही जागा घालत आहेत. वृक्षतोड पाहून मन पिटाळून जातं” असं धंगेकर म्हणाले. “जरांगे पाटील यांचे आंदोलन जे आहे ते योग्य आहे. मराठा समाज गरीब आहे, शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे.आंदोलन करत आहेत त्यात गैर काही नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
