कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

"आर्थिक अडचणीच्या काळात विद्यार्थी शुल्काचा भार सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कोरोना काळातील महाविद्यालयीन फी कमी झाली पाहिजे," अशी मागणी युवक क्रांती दलाने (युक्रांद) केलीय.

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी


पुणे : “आर्थिक अडचणीच्या काळात विद्यार्थी शुल्काचा भार सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कोरोना काळातील महाविद्यालयीन फी कमी झाली पाहिजे,” अशी मागणी युवक क्रांती दलाने (युक्रांद) केलीय. या मागणीसाठी युवक क्रांती दलाकडे विद्यार्थ्याच्या गूगल फॉर्मदवारे 5000 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीसह युक्रांदने प्रशासनाकडे फी माफीची मागणी केलीय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे. अन्यथा युवक क्रांती दलाकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही युक्रांदच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. याबाबत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली (Yukrand demand decrease in school and college fee amid corona).

युक्रांदने आपल्या निवेदनात म्हटलं, “मार्च 2020 पासून देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शेतीतील उत्पन्न अल्प आहे. विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. गेल्या 1 वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण Online पद्धतीने चालू आहे. कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही, परंतु महाविद्यालयांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे.”

विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कात कशाचा समावेश?

यामध्ये मेटेनन्स चार्ज (Maintenance charges), प्रयोगशाळा शुल्क (Laboratory fee), व्यायामशाळा शुल्क (Gym fee), संगणक प्रयोगशाळा शुल्क (Computer lab fee), गणवेश शुल्क (Uniform fee), अभ्यास साहित्य (Study Material), शालेय साहित्य शुल्क (Stationary fee),इंटरनेट शुल्क (Internet charges), फिल्ड वर्क (Field work), इतर कृतीकार्यक्रम (Extra-curricular activities), वाहन शुल्क (Vehicle charges) असे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत.

“फी भरावी यासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास”

“विद्यार्थ्यांनी फी भरावी यासाठी महाविद्यालयं दबाव टाकत आहेत. फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करून घेणार नाही किंवा internal exam ला बसू देणार नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात आहे. विद्यापीठाचे फॉर्म इनवर्ड करण्याबाबतचे परिपत्रक असून देखील याबाबत महाविद्यालये विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. फी भरणे शक्य नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची नामुष्की ओढवली आहे,” असंही युक्रांदने नमूद केलंय.

या प्रश्नासंबंधी युवक क्रांती दलाने (युक्रांद) पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी युक्रांदचे संदीप बर्वे (राज्य कार्यवाह), जांबुवंत मनोहर (राज्य संघटक), सचिन पांडुळे (पुणे शहराध्यक्ष), विद्यार्थी प्रतिनिधी जुबेर चकोली, प्रकाश गाडे उपस्थित होते.

हेही वाचा :

औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

व्हिडीओ पाहा :

Yukrand demand decrease in school and college fee amid corona