भुजबळांच्या टीकेनंतर विखे पाटलांचं मोठं विधान, थेट वकिलांसमोरच भुजबळांशी चर्चा
शुक्रवारी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शुक्रवारी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. विखे आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरून गेले, गेले तर गेले जीआर पण काढला असं भुजबळ यांनी म्हटलं होतं, दरम्यान त्यानंतर आता भुजबळ यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
माझी भूमीका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय सोडवला आहे, भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण कधी वाटलं नाही. आता सध्या कोर्टात पाच जनहीत याचिका दाखल झाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत, ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का? असा सवाल यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांना केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, कायद्याचा चौकटीत बसून मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. भुजबळांना भेटणार आहे, आणि त्यांना समजून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना पण घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजून संगतील, आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असं विखे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवलं. त्यांनी निस्वार्थीपणे आंदोलन केलं. आम्ही जे काही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून विषय मार्गी लावला आहे. तुम्ही त्यांच शिक्षण काढत आहात हे चुकीच आहे, या पुढाऱ्यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार आणि न्यायमूर्ती शिंदे यांना बोलवून त्यांना विषय समजून सांगणार, असं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
