Sunil Tatkare: शरद पवार राष्ट्रवादीची महायुतीत एंट्री? सुनील तटकरे यांच्या वक्तव्याची तुफान चर्चा
Sunil Tatkare Big Statement: खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार आणि राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) हा विलिनीकरण न होता महायुतीमध्ये येणार असल्याच्या चर्चांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

संतोष गोतार्णे, प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी: खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री होणार आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा विलिनीकरण न होता महायुतीमध्ये येणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. त्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी या विषयावर मोठे भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे सध्याच्या राजकारणाचे अंतर्गत पदर समोर येत आहे.
महायुतीला आता कुणाची गरज नाही
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीविषयी खासदार सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले. “माध्यमांच्या चर्चेवरती माझ्यासारख्या अध्यक्षपदावरती असलेल्या व्यक्तीने सूतोवाच करणं काही योग्य नाही.राज्यात महायुतीचं सरकार २३८ संख्याबळावरती मजबूत भाजपा १२५, शिंदे साहेबांच्या पक्षाचे ६०, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे ४१ आमदारांच आहे. त्याच्यामुळे आजचं राजकीय चित्र स्पष्ट आहे.” असे म्हणत तटकरेनी महायुतीला आणखी कोणाची गरज नाही असे सुतोवाच केले.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे स्वागत
तर महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविषयी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही तटकरे यांनी बाजू मांडली. ” जे विधेयक आता येतंय त्या मध्ये ५० टक्के जागा समान वाढणार असतील, लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येक राज्यातली संख्येच्या ५० टक्के आरक्षण दिलं जात असेल, तर त्याला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील हे विधान सुप्रिया ताईनी केलं आहे. सुप्रियाताई लोकसभा खासदार आहेत, राज्यसभे मध्ये त्यांनी काम केलं आहे, उत्कृष्ट संसदपटू आहेत; त्यांच्या या विधानाचं मी पुन्हा एकदा स्वागत करीन एनडीएचा घटक म्हणून.” असे तटकरे म्हणाले.
मतदारसंघ पुनर्रचनेवर म्हणाले काय?
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरही सुनील तटकरे यांनी मत मांडले आहे. “एनडीएचा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जातोय. इंदिराजी पंतप्रधान असताना 543 जागा निर्धारित करण्यात आल्या त्याच्यामध्ये आज चार पट लोकसंख्या वाढलेली आहे. आणि ५०-६० वर्षांच्या कालावधीनंतर जे होतंय, त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे.” असे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाला राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ भेटते याचे मात्र स्वागत केले.