गणपती उत्सवासाठी रेल्वे सज्ज, चाकरमान्यांसाठी ३८० गाड्यांची तजवीज
गणपती विशेष गाड्यांची माहिती स्थानकावरील चौकशी काऊंटर किंवा www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. तसेच NTES एप डाऊनलोड करू शकतात.विशेष गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आयआरसीटीसी संकेतस्थळावर, रेलवन ॲपवर आणि संगणकीकृत पीआरएसमध्येही उपलब्ध आहे.

भारतीय रेल्वेने गणपती उत्सवाच्या काळात चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे स्थानकांवर खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कोकण मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत ३८० गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.मध्य रेल्वेने सणासुदीसाठी कोकणासाठी मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर आदी विविध ठिकाणांसाठी तब्बल ३०६ विशेष फेऱ्या चालवून सर्वाधिक गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
भारतीय रेल्वेने श्रीगणेश उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या आरामदायी आणि सुरळीत प्रवासाकरिता विशेष व्यवस्था केली आहे. रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत ३८० गणपती विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा केली आहे.तसेच मध्य रेल्वेने मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर आदी विविध ठिकाणांसाठी तब्बल ३०६ विशेष सेवा चालवून सर्वाधिक गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
२२ ऑगस्ट २०२५ पासून गणपती उत्सवानिमित्त विशेष गाड्यांची सुरुवात झाली असून प्रवाशांचा प्रवास सुकर आणि निर्विघ्न होण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष प्रयत्न केले आहेत.
विशेष व्यवस्था पुढीलप्रमाणे :
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर दि.२२ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
२. गणेशोत्सव काळातील प्रवासी ओघ सुरळीत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर वाणिज्यिक निरिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
३. दि. २२ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी सुमारे १८० तिकीट तपासणी कर्मचारी सतत (२४x७) तैनात करण्यात आले आहेत.
४. चिंचपोकळी आणि करीरोड स्थानकांवर दिवसरात्र अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
५. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर अतिरिक्त तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३० मोबाईल-यूटीएस यंत्रणा वितरित करण्यात आल्या आहेत.
६. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर आणि कॉटन ग्रीन स्थानकांवर २७ ऑगस्ट २०२५ पासून दहा दिवसांसाठी मोबाईल-यूटीएस आणि यूटीएस ॲप प्रचार पथक तैनात करण्यात येणार आहे.
७. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर दि. २७.०८.२०२५ पासून प्रत्येकी दोन अतिरिक्त यूटीएस विंडोस सुरू करण्यात येणार आहेत.
८. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर आणि कॉटन ग्रीन स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त सहाय्यक नियुक्त केले जातील.
९. शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्रमुख ठिकाणी गणपती विशेष गाड्यांचे बॅनर्स आणि स्टँडीज लावण्यात आले आहेत.
१०. गणपती विशेष गाड्यांची जाहिरात वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमांतून केली जात आहे.
११. नियमित घोषणा सुरळीत पार पडाव्यात यासाठी मुख्य वाणिज्यिक निरीक्षक (उद्घोषक) मध्यवर्ती घोषणा कक्षात तैनात राहतील.
