
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहणार आहेत. २६ ते ३० जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच २७ ते ३० जून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे.
नागपुरात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे हसनबाग रोडवर साचले होते. या भागांत एक फुटापर्यंत पाणी साचले. तसेच पावसामुळे रात्री नंदनवन कॅालनी, हसनबाग आणि परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. या भागात सिमेंट रोड उंच असल्याने रस्त्यावरचे पाणी लोकांच्या घरात शिरले होते. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत लोकांच्या घरात पाणी होते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागली. रात्री दोननंतर पाणी ओसरले. बुधवारी रात्री ८.३० पर्यंत नागपुरात ८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २६ जूनपासून २९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/BkpNEhC385
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 25, 2025
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नाशिकमध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. नाशिक घाटमाथ्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. यामुळे गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी कमी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील. परंतु पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात मागील दोन आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने तालुक्यातील खरीप हंगामातल्या जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. विदर्भात अजून पावसाने जोर घेतला नाही. यामुळे या भागातील पाणीप्रश्न गंभीर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दळी मारलेला पाऊस गुरुवारी सुरु झाला. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.