महाराष्ट्रात तिसरा पर्याय, राज आणि राजू शेट्टी एकत्र येणार?

शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसात दोघांची ही दुसरी भेट आहे.

  • Publish Date - 6:39 pm, Sat, 6 July 19 Edited By:
महाराष्ट्रात तिसरा पर्याय, राज आणि राजू शेट्टी एकत्र येणार?

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्या युतीला पर्याय म्हणून मनसे-स्वाभिमानी यांची आघाडी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसात दोघांची ही दुसरी भेट आहे.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणात घेतली होती. आता आणखी एक नवा पर्याय तयार होत असल्याने मतांचं आणखी विभाजन होणार आहे. त्यामुळे याचा थेट फायदा शिवसेना-भाजप युतीला होईल, असं अंदाज लावला जातोय. विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच राज ठाकरेंना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती.

राजू शेट्टी आणि राज ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेचंही मोठं नुकसान आहे. कारण, राज्यात मतदारांसमोर एक नवा पर्याय तयार होईल आणि मनसेलाही पूर्ण ताकदीने उतरता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी शेतकऱ्यांची मतं स्वाभिमानीला मिळतील आणि शिवसेनेच्या मतांचं विभाजन मनसेकडून होईल, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.

शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने अजून जागांचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. राज्यभरात दहा सभा घेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र राज्यात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला.