त्यामुळेच भाजप खासदारावर तोंड लपवून फिरण्याची वेळ, मनसे नेत्याचा हल्लाबोल
राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादात मनसे नेते संदीप देशपांडे सामील झाले आहेत. दुबे यांनी मराठी भाषेवर केलेल्या टीकेनंतर, देशपांडे यांनी "समुद्रात दुबे दुबे कर मारेंगे" असे लिहिलेले टी-शर्ट घालून प्रतिउत्तर दिले.

सध्या राज्यात महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंनी दुबेच्या धमकीवर खोचक टोला देत प्रतिक्रिया दिली होती. आप मुंबई आइए. मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्याच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशिकांत दुबेंना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांनी पांढऱ्या रंगाचे टीशर्ट परिधान केले होते. यावेळी त्यांच्या टीशर्टवर समुद्रात दुबे दुबे कर मारेंगे असे म्हटले आहे. आता याबद्दल संदीप देशपांडे यांना विचारणा करण्यात आली. निशिकांत दुबे यांना तोंड लपवून फिरण्याची पाळी आली आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
“राज ठाकरेंनी जो इशारा दिला होता, तोच इशारा या टिशर्टद्वारे देण्यात आला आहे. महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल ज्या लोकांच्या मनात द्वेष आहे, त्या लोकांना राज ठाकरेंनी दिलेला हा इशारा होता. हाच इशारा टीशर्टच्या माध्यमातून देतोय. निशिकांत दुबे यांना एकदा महाराष्ट्रात येऊ तर द्या, त्यांचा इथे फ्लॅट आहे. एकदा त्यांना येऊ द्या, मराठी माणूस काय आहे ते कळेल. मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा द्वेष प्रकट केला तर तोंड लपवून फिरण्याची पाळी येणार आहे. तीच पाळी त्यांच्यावर आली आहे”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
समुद्रात ‘दुबे दुबे कर मारेंगे ‘ pic.twitter.com/b4ngaM738L
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 27, 2025
दरम्यान निशिकांत दुबे यांनी आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान दिलं होतं. निशिकांत दुबेंच्या विधानाचा राज ठाकरेंनी मीरा-रोडमधील सभेत खरपूस समाचार घेतला होता. दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु…त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो…दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
