कल्याण-डोंबिवली, ठाणे… उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं… शिसारी आली; राज ठाकरे थेट काय म्हणाले?

Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

कल्याण-डोंबिवली, ठाणे... उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं... शिसारी आली; राज ठाकरे थेट काय म्हणाले?
Raj Thackeray on Politics
Image Credit source: X
| Updated on: Jan 23, 2026 | 8:18 PM

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे. महापालिकांच्या निवडणुकीनंतर वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर आली आहेत. यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी राजकीय पक्षांना टोला लगावला आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

शिसारी आली…

महापालिका निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी आपली तत्वे सोडून युती केली आहे. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज गुलामांचा बाजार झाला आहे. हे सर्व महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता. हे चित्र समोर उभं राहिलं आहे महाराष्ट्रात. पूर्वी दोनशे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आज ते लिलाव सुरू आहे. कल्याण डोंबिवली, ठाणे अनेक ठिकाणी. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं. शिसारी आली. काय सुरू आहे. कुठे नेतो आपण.

मी ज्यावेळी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत ही चांगली गोष्ट आहे. तो माणूस हे पाहूच शकला नसता. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाकीच्या पक्षात बघा. अनेक लोकं दिसतील ते बाळासाहेबांनी उभे केले आहेत. पण ज्या गोष्टी घडत जातात, घडत गेल्या, मी ज्यावेळी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं. माझ्यसाठी घर सोडणं होतं. 20 वर्षाचा काळ निघून गेला. अनेक गोष्टी मलाही उमजल्या. मला वाटतं अनेक गोष्टी उद्धव यांनाही उमजल्या असतील. त्या सोडून द्या आता.’

बाळासाहेब ठाकरे जगाला कळलेच नाहीत

राज ठाकरेंनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मला वाटतं की, एकदा मी बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सर्व पैलू मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत. हत्तीची गोष्ट म्हणतो ना, कुणाला शेपूट, कुणाला कान असे वाटते. प्रत्येकाला वाटतं हा माणूस असा होता. तो माणूस कसा होता हे जगाला कळलं नाही. आम्हाला नाही कळलं तुम्हाला कसं कळणार? ते होतं ते विलक्षण होतं.