राज अन् उद्धव ठाकरेंवर नागरिक नाराज, पोहोचले पोलीस ठाण्यात, म्हणाले कारवाई करा; नेमकं काय आहे प्रकरण?
शिवाजी पार्कातील दीपोत्सव सोहळ्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. परंतु या कार्यक्रमावरून आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शिवाजी पार्कवर मनसेनं आयोजित केलेल्या ‘दीपोत्सवा’च्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनाचा सोहळाच शुक्रवारी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ‘दीपोत्सवा’चं उद्घाटन झालं. परंतु आता या सोहळ्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान फटाके फोडल्यामुळे झालेल्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे थेट तक्रार केली आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, ज्यामुळे शिवाजी पार्क परिसरात आवाज आणि धुराचं प्रमाण वाढलं होतं. याप्रकरणी शिवाजी पार्क रेसिडेंट्स असोसिएशन आणि इतर स्थानिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
रात्री 10 वाजल्यानंतर फटाके फोडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं, त्यांनी तक्रारीत म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुंबईत फटाके फोडण्याची वेळ रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर फटाके फोडण्यास मनाई आहे.
स्थानिक रहिवासी का नाराज?
दरवर्षी दिवाळी आणि दीपोत्सवादरम्यान शेकडो लोक पार्कात जमतात. रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवल्यामुळे रहिवाशांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मर्यादित वेळेनंतर फटाके फोडण्यास जबाबदार असलेल्या आयोजकांवर किंवा व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असंही त्यांनी म्हटलंय. तर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.
दीपोत्सवात मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल, अशा शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं. राज आणि उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. ही दिवाळी वेगळी आणि विशेष आहे, मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश हा सर्वांना आनंद देत राहील, असं ते म्हणाले. दीपोत्सवाच्या निमित्ताने रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे तसंच राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्यातील नात्यांचा धागा अधिक घट्ट झाल्याचं पहायला मिळालं.
