मातोश्रीवर स्नेहभोजन की युतीचा मुहूर्त? तीन महिन्यांत 7 भेटी, राज-उद्धव भेटीचा संपूर्ण घटनाक्रम एकदा पाहा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ९९ दिवसांत ७ भेटी झाल्या आहेत. नुकतीच राज ठाकरे आईसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील जवळीकता वाढताना दिसत आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींचे सत्र गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. साधारण गेल्या ९९ दिवसांच्या कालावधीत ही सातवी भेट आहे. आज राज ठाकरे थेट आईला घेऊन मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले. ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे-ठाकरे सेना युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
राज ठाकरे यांची आजची मातोश्री भेट ही अत्यंत खास आहे. कारण राज ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. ‘मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा आणि तुळसी वृंदावन पाहायला मिळत होते.
ही भेट कौटुंबिक असली तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सातत्याने सुरू असलेल्या या भेटीगाठी महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा देतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुका आणि सत्ताधारी युतीविरोधात एकी साधण्यावर गंभीर राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या तीन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील तीन महिन्यांच्या कालावधीत कधी आणि कोणत्या निमित्ताने एकत्र आले, याचा घटनाक्रम आपण पाहूया.
५ जुलै २०२५ – मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर पाहायला मिळाले.
२७ जुलै २०२५ – मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली. थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले.
२७ ऑगस्ट २०२५ – या भेटीच्या चर्चा राजकारणात तग धरून होत्याच आणि तब्बल दोन दशकानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरच्या गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थिती दाखवली.
१० सप्टेंबर २०२५ – गणेश मुहूर्त हा भेटीचे निमित्त ठरला. पण गप्पा मात्र अपुऱ्या झाल्या. पुन्हा सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले.
५ ऑक्टोबर २०२५ – ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र सहकुटुंब पाह्याला मिळाले. याच दिवशी दुपारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली
१२ ऑक्टोबर २०२५ – राज ठाकरे आईला घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेह भोजनाचा मातोश्री येथे कार्यक्रम
संपूर्ण राज्याचे लक्ष
ठाकरे बंधूंमधील जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत असल्याने, मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. या भेटी केवळ कौटुंबिक मर्यादेपुरत्या आहेत की यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
