कितीही विमान जळालं तरी…, अजितदादांच्या अपघाताबद्दल राज ठाकरेंनाही संंशय? केलं मोठं वक्तव्य

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांना या अपघाताबद्दल माहिती दिली, त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

कितीही विमान जळालं तरी..., अजितदादांच्या अपघाताबद्दल राज ठाकरेंनाही संंशय? केलं मोठं वक्तव्य
Raj Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 2:21 PM

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अनेकांकडून या अपघातावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करतानाच अपघाताच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजूनही या प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्यानं रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणात काल पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान त्यानंतर आज रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  त्यांनी राज ठाकरे यांना या विमान अपघाबाबत माहिती दिली, तसेच आपल्या मनातील शंका देखील सांगितली. दरम्यान रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

‘मध्यंतरी मी कुणाशी तरी बोललो की अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये. रोहित पवारांनी टेक्निकल गोष्टी सांगितल्या. मला एकच गोष्ट जाणवली. त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, यावर देखील राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ब्लॅक बॉक्सचंही काही कळलं नाही. किती विमान जळालं तरी ब्लॅक बॉक्स जळत नसतो. सरकार या सर्वामागे संशयाची भूतं नाचवत आहे. यामागे राजकारण काय आहे माहीत नाही.’ असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us