Sanjay Raut : व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती देखील व्होट चोरी करत होता, प्रत्येक गोष्टीला… संजय राऊत यांचा सूचक इशारा काय ?
संजय राऊत यांनी 'व्होट चोरी'वरून केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो यांच्याशी तुलना करत त्यांनी विरोधकांना तुरुंगात डांबणे आणि निवडणुकीतील गैरव्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर टीका केली, तसेच भाजपच्या पक्षप्रवेशांवरून भ्रष्टाचाराचा आरोप करत प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असा सूचक इशारा दिला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा व्होट चोरीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हा निशाणा साधतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणाशी थेट व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो याांच्याशी संबंध जोडला आहे. व्हेनेझुएलाचा राष्ट्रपतीही व्होट चोरी करत होता. विरोधकांना फोडत होता. शेवटी काय झालं? प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच असतो, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सूचक इशारा दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील आठवणी पुसायच्या आहेत, असं विधान केलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना हे विधान केलं. त्यांना शिवाजी महाराज, पंडीत नेहरू आणि महात्मा गांधींच्या आठवणी पुसायच्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी पुसायच्या आहेत. शरद पवार यांचं कार्य पुसायचं आहे. त्यांना फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या आहेत. जेव्हा अतिरेक झाला. तेव्हा व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा व्होट चोरी करत होता. तोही विरोधकांचे लोकं फोडत होता. विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला अंत आणि शेवट असतो. असा अंत या लोकांचा होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
भाजपला काय एवढं सोनं लागलंय ?
मनसेचे नेते संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जात आहात. औरंजेब त्यांचाच आहे. गुजरातलाच जन्माला आलाय. औरंगजेब हे भाजपचं निशान आहे. आमच्याकडचेही काही लोक भाजपमध्ये गेले. काँग्रेसचेही गेले. काय एवढं त्या भाजपला सोनं लागलं आहे मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार आहेत? तुमच्या पर्यंत भ्रष्टाचाराचे पैसे जातील. पण पुढच्या पिढीचं कसं होईल? असा सवाल राऊत यांनी केला.
तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांप्रकरणी निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काही अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यावरून राऊत यांनी आयोगावर तोंडसुख घेतलं. निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना देशासाठी धोकादायक आहे. यावर निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे का? का अमित शाह यांचा फोन आला पाहिजे? का फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसलं पाहिजे? या पद्धतीने काम करा म्हणून सांगितलं पाहिजे का? निवडणूक आयोग यांच्या ताटाखालचं मांजर आहे. निवडणूक आयोग एजंट म्हटल्यावर तो अहवालाचीच भाषा आहे. निवडणूका घेणं बंद केलं पाहिजे. जोपर्यंत मोदी शाह सत्तेत आहेत. तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे. निवडणुकाच घेऊ नये, असा हल्लाच त्यांनी चढवला.
