Rohit Arya Encounter : रोहित आर्या प्रकरणात मोठा खुलासा, दीपक केसरकर यांनी काय दिली कबुली?
पवईतील आर.ए. स्टुडिओमधील ओलीस नाट्यात रोहित आर्याने अल्पवयीन मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवले होते. शिक्षण विभागाच्या थकबाकीमुळे हे कृत्य केल्याचा त्याचा दावा होता. पोलिसांनी बोलण्यास सांगितल्यावर, माजी मंत्री दीपक केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला. नंतर रोहित आर्या पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. केसरकरांनी नकार देण्याचे कारण आता स्पष्ट केले आहे, तर पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे.

गेल्या आठवड्यात ( 30 ऑक्टोबर) पवईतील आर.ए.स्टुडिओमध्ये मोठं ओलीस नाट्य घडलं. आर्थिक व्यवहारांशी संबंधित मागण्यांवरून रोहित आर्या (Rohit Arya) या इसमाने 15 अल्पवयीन तसेच ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 19 जणांना ओलीस ठेवलं होतं. शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाच्या थकबाकीमुळे हे कृत्य केल्याचा दावा रोहित आर्याने केला होता. काम करूनही रक्कम थकीत असल्याने नाराज असल्याचे त्याने सांगितले होते. अखेर मुलांना वाचवताना पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान एन्काऊंटरमध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रोज नवनवे अपडेट्स समोर येत असून मुलांना ओलीस ठेवणाऱ्याना रोहितने त्यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून बोलण्याची मागणी केली होती. मात्र केसरकर यांनी त्याच्याशी बोलण्यस नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्याशी बोलण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती, , पण आपण त्याच्याशी बोलण्यास नकार दिला अशी कबुली केसरकर यांनी दिली. मात्र आपण असं का केलं याचाच खुलासा केसरकर यांनी केला आहे.
रोहित आर्याशी बोलण्यासंदर्भात आला होता फोन
रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्यावर पोलिस त्याच्याशी संपर्क साधून बोलत होते, त्याच्या मागण्या पोलिसांनी ऐकून घेतल्या. त्यावेळी रोहितन याने माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. तेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संप्रक साधून त्यांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती अशी माहिती समोर आवी. मात्र केसरकर यांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला होता, असेही समजते.
का दिला नकार ?
आता याच प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आपण रोहित आर्याशी बोलण्यास नकार का दिला याचा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनीच केला आहे. त्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. ” मी सध्या मंत्री नाही, म्हणून रोहित आर्याशी बोलून त्याला कोणंतही ठोस आश्वासन देऊ शकत नव्हतो. मुलं ओलिस असताना आर्या याला ठोस आश्वासन देणं गरजेचं होतं. म्हणूनच संबंधित मंत्री किंवा शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी त्याने बोलावं अशी सूचना मी पोलिसांना दिली होती,” असं केसरकर यांनी म्हटलं. शिवाय पुढच्या काळात पोलिसांनी समन्स बजावल्यास, चौकशीला बोलावल्यास तपासामध्ये सहकार्य करेन असंही केसरकर यांनी नमूद केलं.
पोलीस रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते , त्याचाच एक भाग म्हणून केसरकरांनी त्याच्याशी बोलण्याबद्दल पोलिसांनी त्यांना विचारणा केली होती. मात्र केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला आणि नंतर आर्याचे एन्काऊंटर झाले. त्याचा मृत्यू झाला. केसरकर अप्रत्यक्षपणे या प्रकरणाशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच येत्या काळात केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. आता याप्रकरणात गुन्हे शाखेचा तपास कसा होता आणि दीपक केसरकस यांचा जबाब कसा नोंदवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रोहित आर्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आला असून त्याच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट झालं आहे. रोहित आर्याचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला. त्या गोळीचे स्वरूप पाहता त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे जे. जे. रुग्णालयात झालेल्या पोस्टमर्टममधून समोर आलं आहे.
