Rohit Pawar : अजितदादा यॉर्कर टाकतात, जयंतराव गुगली, तर चंद्रकांतदादा सोनं, पण या बेन्टेक्सचं काय करायचं?; रोहित पवार यांची तुफान टोलेबाजी
इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी भाषणादरम्यान रोहित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली

चंद्रकांत पाटील भाजपमध्ये असले तरी भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहेत. अनेक वर्ष त्या पक्षात तुम्ही आहात. तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही ऐकता. विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवता. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण हे तुमचं धोरण आहे. चंद्रकांत दादा तुम्ही सोनं आहात. पण आताच्या काळात काही बेन्टेक्सचे लोकं या जिल्ह्यात फिरत आहेत. खालच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पाहिलं पाहिजे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी भाषण करताना रोहित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली. क्रिकेटच्या भाषेत अजित दादा यॉर्कर टाकणारे आहेत, फास्ट बॉलर आहेत. जयंत पाटलांबाबत बोलायचं झालं तर कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात पण कधीकधी गुगलीदेखील टाकतात आणि चंद्रकांत दादा मीडियम पेस बॉलर असं म्हणत रोहित पवारांनी क्रिकेटची अख्खी कुंडलीच मांडली. या भाषणादरम्यान त्यांनी फटकेबाजी तर केलीच पण पडळकरांचे नाव न घेता त्यांच्यावरही खरपूस टीका केली.
अजित दादांच्या स्पीडची भीती वाटते – रोहित पवार
क्रिकेटच्या भाषेत अजितदादांच्या बाबत बोलायचं झालं, दादा यॉर्कर टाकणारे आहेत. फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडची बॅटसमनला भीती वाटते अशी मिश्किल टिपण्णी रोहित पवार यांनी केली. चंद्रकांतदादा इथे आहेत. कधी बॉलिंग करतात तर कधी बॅटिंग करतात. पण मीडियम पेस बॉलर आहेत. पण बॉलिंगही चांगली टाकतात. जयंत पाटलांबाबत बोलायचं झालं तर कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात. आणि कधी कधी बॉल हातातच असतो, पण बॅटसमनला वाटतं बॉलिंग टाकली. आणि आमच्यासारखे नवखे खेळाडू व्यासपिठावर आहोत. हे अनुभवी खेळाडू बॉल टाकतात, आम्ही जमेल तसा बॉल मारण्याचा प्रयत्न करत असतो असं रोहित पवार म्हणाले.
तो विचार जपायचं काम आपण केलं पाहिजे.
पुढे रोहित पवार म्हणाले, या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते देशाला राज्याला दिले. यशवंतराव चव्हाण, अण्णाभाऊ साठे, क्रांतीसिंह नाना पाटील, राजाराम बापू, नागनाथ अण्णा नायकवडी, पतंगराव कदम, आर आर पाटील, वसंतदादा पाटील आणि आताच्या काळात या परिसराचं नाव पुढे नेलं ते जयंतराव पाटील साहेब आहेत. एनडी पाटीलही या भूमीतीलच. या संस्था महत्त्वाच्या आहेत. महात्मा फुले, सावित्री माई फुले यांनी प्रयत्न केले म्हणून बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिकता आलं. त्यांच्या विचाराचा वारसा भाऊराव पाटील, एनडी पाटील आणि आमच्या माईने पुढे नेला. एनडी मामा म्हणायचे, या संस्था नसून तो विचार आहे. तो विचार जपायचं काम आपण केलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकारणात वेगळे असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत
एनडी पाटील यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कष्ट करणारं व्यक्तीमत्त्व. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटीलच्या संस्थेत शिक्षण घेतलं. तिथेच प्राध्यापक झाले. स्वत शाळेत जाऊन अडचणी सोडवायचे. महात्मा फुलेंना सावित्री माईंनी ताकद दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना लक्ष्मीबाईंनी ताकद दिली. त्यांचाच वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन जातांना आमच्या माईंनी एनडी पाटलांना ताकद दिली. त्यांच्या पाठी भक्कम उभं राहून राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक काम केलं.
एनडी पाटील यांचं कार्य मोठं होतं. आमदार आणि मंत्री होते. शेकापचे प्रमुख नेते होते. विधीमंडळात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी पत्रकारही यायचे. अभ्यासू भाषण करायचे. आम्ही त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या हातात एक पुस्तक असायचं. सकाळी पुस्तक वाचायला घेतलं तर ते संध्याकाळपर्यंत संपायचं असं रोहित पवार यांनी सांगितलं. शरद पवार आणि एनडी पाटील यांनी एकत्र काम करायचे. एनडी पाटील यांनी नेहमी पवारांवर नेहमी टीका केली. पण ती सकारात्मक असायची. आजच्या काळातील खालच्या पातळीची टीका नसायची. पण कुटुंबातील कार्यक्रमात दोघेही एकत्र यायचे. राजकारणात वेगळे असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत असा उच्चारही त्यांनी केला.
आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला… अजित दादांना लगावला टोला
याच भाषणादरम्यान रोहित पवारांनी एक किस्सा तर सांगितलाच पण अजित पवारांना टोलाही लगावला. ते म्हणले, ‘ काही वर्षापूर्वी अधिवेशनात माझं भाषण झालं. सर्वांचे फोन आले अत्यंत चांगलं भाषण झालं म्हणून सांगितलं. मग मला अजितदादांचा फोन आला. तेव्हा पार्टी म्हणून एक होतो. त्यांनी घरी बोलावलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं भाषण चांगलं झालं. अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं भाषण चांगलं झालं. पण एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, भाषण देत असताना, अधिवेशनात असताना तुझ्यावर कॅमेरा असतो. बटन बिटन जरा वर पर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्याकाळात त्यांचं माझ्यावर होतं’ असा किस्सा त्यांनी सांगितल. मात्र आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठं तरी विसरले आहेत. अर्थमंत्री आहेत. कुठं तरी निधीच्या बाबतीत त्यांनी विचार करावा असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
धनंजय मुंडेंवरही साधला निशाणा
मंत्रीपद जाऊन पाच महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. याच मुद्याचा समाचार घेत रोहित पवारांनी त्यावरूनही टीकास्त्र सोडलं. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ” १९८०मध्ये पुलोदचं सरकार होतं. एनडी पाटील सहकार मंत्री होते. काही कारणाने सरकार पडलं. ज्या दिवशी सरकार पडलं त्याच दिवशी एनडी पाटलांनी शासकीय बंगला सोडला. आजच्या काळात तुम्ही पाहता पाच पाच महिने झाले तरी लोक बंगला सोडत नाही, पण त्यांनी सोडला. शासनाची गाडी सोडली. मुंबई सेंट्रलला गेले. बसमध्ये बसले आणि कोल्हापूरला गेले. अशा विचारांचे नेते होते”. हा किस्सा सांगत त्यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
पडळकरांवर निशाणा
याच भाषणादरम्यान रोहित पवारांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकरांनाही टोला लगावला.
चंद्रकांत पाटील भाजपमध्ये असले तरी भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहेत. अनेक वर्ष त्या पक्षात तुम्ही आहात. तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही ऐकता. विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवता. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण हे तुमचं धोरण आहे. चंद्रकांत दादा तुम्ही सोनं आहात. पण आताच्या काळात काही बेन्टेक्सचे लोकं या जिल्ह्यात फिरत आहेत. खालच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पाहिलं पाहिजे, असं म्हणत रोहित पवारांनी पडळकरांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
