तुमच्या भूमिका सिलेक्टिव्ह, तुम्हीही अण्णा हजारेंच्या… रोहित पवारांचा अंजली दमानियांवर निशाणा
रोहित पवार यांनी अंजली दमानिया यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्या भूमिकांच्या निवडक स्वरूपाबाबतच्या आरोपांना खंडन केले आहे. तीन प्रमुख मुद्दे पुढे ठेवून त्यांनी दमानिया यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील विविध मुलभूत कामांसंदर्भात एक जाहीर सभा घेतली होती. या सभेत रोहित पवार एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले होते. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत डिवचलं होतं. जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा?, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला होता. आता यावरुन रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत राज्य शासनाच्या ई-निविदा सूचनांची माहिती पाहायला मिळत आहे. यातच शेगाव व पंढरपूर पालखी दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या मे. मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेट कंपनीने विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन केले आहे, याबद्दलचे एक पत्रक शेअर केले आहे. त्यासोबतच त्यांनी लांबलचक कॅप्शन दिले आहे. तुमच्या भूमिका प्रामाणिक आहेत यात शंका नाही, पण त्या ‘सिलेक्टिव्ह’ असल्याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत. ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
माननीय अंजलीताई,
सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही… पण तरीही खालील प्रमुख तीन विषय पुराव्यासह आपल्या निदर्शनास आणून देतो…
१)आज राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी २० लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का?
२)मेघा इंजिनिअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केलं म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ९५ कोटींचा दंड ठोठावून त्याचं साहित्य जप्त केलं, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ १७ लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का?
३)#सिडको ची ५००० कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे १२००० पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का?
या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत… अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील..! आपणास शुभेच्छा..!, असे रोहित पवार यांनी म्हटले.
माननीय अंजलीताई, सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात… https://t.co/zMuMqYrhIm pic.twitter.com/Nns4l0wMw4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2025
आणखी वाचा : कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने चिमुकल्याला मारहाण, निर्दयी शिक्षिकेचा धक्कादायक Video व्हायरल
दरम्यान रोहित पवारांनी अंजली दमानिया यांना या तिन्ही विषयांवर त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत. अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील..! असे रोहित पवार यांनी म्हटले.
