
Sachin Kharat : राज्यात महानगरपालिका निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाचा तारीख जवळ येत असल्याने आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. राज्यातील बडे नेते राज्यभरात सभा घेत आहेत. या नेत्यांच्या सभांना लोकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या महापालिका जिंकण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जिवाचे रान करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकादेखील तेवढ्याच महत्त्वाच्या असून येते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. परंतु आता अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दादांना हा जबर झटका बसला आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे निवडणुकीचे गणित बदलणार आहे.
अजित पवार यांनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरपीआय (खरात) गटाशी युती केली होती. परंतु आता अजित पवार यांना आरपीआय (खरात गट) पक्षाचे प्रमुख सचिन खरात यांनी जबर धक्का दिला आहे. सचिन खरात यांनी अचानकपणे महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी माझा कोणत्याही उमेदवाराल पाठिंबा नसेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. दलित मतदारांसाठी अजित पवार यांनी खरात यांना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथे काही जागा दिल्या होत्या. परंतु आता खरात यांनीच निवडणुकीतून माघार घेतल्याने अजितदादांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
सचिन खरात यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची भूमिका जाहीर केली आहे. “मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला तसेच कोणत्याही उमेदवाराला माझा पाठिंबा नाही,” असं खरात या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळेच आता अजित पवार नेमका काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.