ओम्या बैलाप्रमाणेच होता साताऱ्याचा म्हाद्या, मालकाने ज्याची समाधी बांधली..
शर्यतीचा राजा ओम्या बैल वारला त्याप्रमाणे साताऱ्याचा हिंदकेसरी म्हाद्या बैलही साल २०१३ मध्ये मालकाला सोडून गेला. म्हाद्या बैलाच्या मालकाने त्याची वर्धन किल्ल्याच्या पायथ्याशी समाधी बांधली आहे.

सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी हे शंभर सव्वाशे वस्तीचं गाव हे म्हाद्याच्या मालकांचे मुळ गाव. वर्धन गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातील शंकर मदने अण्णा यांच्या दावणीला म्हाद्या बैल होता. तो बैल त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना दिला होता. म्हाद्या बैलाच्या धुडगुसाला कंटाळून सासऱ्याने हा बैल जावयाला दिला होता. चिंचणी हे म्हाद्याचं मुळ गाव. सासऱ्याला म्हातारपणी त्रास नको म्हणून म्हाद्या बैल शंकर मदने यांच्या घरी आला. हा बैल सासऱ्याकडून जावयाकडे आला तरी नीट रहात नव्हता, उलट अधिकच त्रास द्यायला लागला होता. कुठ दगडीच चघळ, तर कुठं मातीच खा अशी त्याला सवय लागली होती. शेतीच्या कामासाठी देखील तर तो तयारच नसायचा. शेवटी मालकाने त्याला किणीच्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. पण काही कारणांनी मदने यांना त्याला काही विकता आले नाही. शेवटी शंकर मदने यांच्या मित्रांनी म्हाद्याला शर्यतीत पळवण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला शंकर मदने यांनी दुर्लक्ष केलं… शेवटी मित्रांनी फारच आग्रह केल्याने मदने यांनी म्हाद्याला शर्यतीत उतरवण्याचा निर्णय घेतला…
पण बैल शर्यतीत देखील म्हाद्याने त्याचे नखरे सुरुच ठेवले. छकड्याला जुंपलं की म्हाद्या मटकन खालीच बसायचा. त्यामुळे या बैलासोबत शर्यतीत जोडी करायला कोणीही त्यांचा बैल द्यायला तयार होईना. मग, शंकर मदने यांनी म्हाद्याला विकायचं ठरवलंच. मात्र,त्यांच्या चुलत पुतण्याने एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या फायनलच्या म्हावऱ्या बैलासोबत म्हाद्याला जुंपण्याचा निर्णय घेतला आणि काय आक्रीत घडलं. हा जुगार यशस्वी ठरला. म्हाद्या असा पळाला की डोळ्याचे पारणे फिटले. म्हाद्याचा पुतण्या समजून गेला की म्हाद्या लंबी रेसचा घोडा आहे. त्याने आपल्या बैला सोबत म्हाद्याला जुंपून शर्यतीच्या अड्ड्यांवर जायला सुरुवात केली.
त्याकाळी तानाजी आप्पा जाधव यांचा सोन्या बैल शर्यतीचा बेताज बादशाह होता.जिथं जाईल तेथे त्याची हवा असायची.एका शर्यतील नेमक्या याच बैला सोबत म्हाद्याची गाडी लागली आणि म्हाद्याने जिगर केली. तेव्हा नेमक्या दोन फुटाने म्हाद्याचा नंबर हुकला.तेव्हा म्हाद्या लोकांच्या मनात बसला. त्यानंतर बरीच माणसं मदने यांच्याकडे म्हाद्याला आमच्या बैलासोबत जुंपा अशी आर्जवे करु लागली. कोणी कोणी तर त्याला विकत घेण्यासाठी गळ घालू लागली. त्याकाळी म्हाद्याची बाजारात ७५ हजार किंमत लागली होती. पण मदने यांनी त्याला विकण्या ऐवजी गावातील बब्या बैलासोबत जुंपण्याचा निर्णय घेतला. या जोडीने आपल्या दुसऱ्याच शर्यतीत ढवळ वाक्रीच्या अड्ड्यावर आपला पहिला नंबर काढला.त्यानंतर म्हाद्या या वादळाचा सुवर्णकाळ सुरु झाला.तेथून पुढे त्याने मागे वळून बघितलंच नाही.
कोरेगाव, पुसेगाव, खटाव, मघराचं निमगाव,दहीगाव, दीवड, फलटण, तोंडलं, अंबेरी अशी एकापेक्षा एक सरस मैदानं म्हाद्यानं गाजविली. त्या शर्यतील त्यानं एकापेक्षा एक बक्षिसं, सोनं-नाणं, ढाली अशी खोऱ्यानं बक्षिसं कमावली.एकदा तानाजी आप्पा यांनी मदने यांना सल्ला दिला की, ‘चेअरमन म्हाद्याला विकण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका, त्याला मरेपर्यंत सांभाळा.हे असलं दान कुणाच्याबी पदरात पडत नाही.’ मग, आप्पांचा शब्द मानून त्यांनी म्हाद्याला शेवटपर्यंत जपण्याचा निर्णय घेतला. आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत म्हाद्याचा काजळ,प्रधान,बब्या, बाज्या, सोन्या, म्हावऱ्या,थैमान या बैलांबरोबर भारी पैरण जमला होता.आयुष्यात जवळपास १००० शर्यती खेळलेल्या म्हाद्यानं एकूण ५०० शर्यती जिंकल्या. त्यातील २५० मध्ये पहिला नंबर काढला तर उरलेल्यात दुसरा आणि तिसरा क्रमांक काढला.
कोरेगावचे हिंदकेसरी मैदान मारल्यानंतर तर गावकऱ्यांनी म्हाद्याची बँड वाजवून मिरवणूक काढली होती. रामोशीवाडीच्या पोरांचा म्हाद्यावर लय जीव होता. म्हाद्या शर्यतीला निघाला की शंभर – दीडशे पोरे त्याच्या मागे शर्यतीच्या अड्ड्यावर यायची. त्याचा जयघोष करायची..म्हाद्या हा खऱ्या अर्थाने चटणी भाकरवाला पैलवान होता. ओली वाळकी वैरण, एखाद्यावेळी धान्याचा भरडा, एवढच त्याचं अन्न होतं. पण पळताना त्यानं कधी हयगय केली नाही. म्हाद्या आपल्या मालकासारखा देवाला लय मानायचा. त्यामुळे मालकाने तब्बल तीन वेळा त्याला जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घडवले. अशा या महान बैलाचं २१ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले. त्याच्या निधनानंतर रामोशीवाडीचं गावकरी आणि शर्यतप्रेमी जाम हळहळले.
म्हाद्याची समाधी बांधली…
शंकर मदने अण्णा यांना तर म्हाद्या गेला या गोष्टीवरच विश्वास बसत नव्हता. जरा कुठे गेलं तरी ते घरच्यांना सांगायचं जरा माझ्या म्हाद्याला पाणी घाला. त्यांना असं वाटायचं की म्हाद्याला आता हाक मारली की तो धावत येईल आणि आपलं अंग चाटेल. त्यांना त्या आठवणींचा जास्त त्रास व्हायला लागला. म्हाद्याच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय मनाला चैन पडणार नाही म्हणून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. आणि वर्धन गडाच्या पायथ्याशी म्हाद्याची पुतळा रुपी समाधी बांधण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी २१ सप्टेंबरला तेथे म्हाद्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. पंचक्रोशीतील शर्यतप्रेमी या पुण्यतिथीला आर्वजून येतात आणि म्हाद्याच्या आठवणींना उजाळा देत असतात.
