मोठी बातमी! मनोज जरांगे सुद्धा Cockroach Janta Party चे फॅन? 6 जूनच्या दिल्लीतील आंदोलनाविषयी भाष्य काय? अभिजीत दीपके विषयी ते सूचक वक्तव्य
Manoj Jarange Patil On Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात येत आहेत. 6 जून रोजी ते दिल्लीत आंदोलन करत आहेत. या सर्व घडामोडींवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात दाखल होत आहेत. येत्या 6 जून रोजी ते दिल्लीत मोठे आंदोलन करणार आहे. त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. तर सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil On Cockroach Janta Party) यांनी या आंदोलनाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मराठमोळ्या अभिजीत दिपकेंविषयी सुद्धा मोठे भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील हे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाविषयी भरभरुन बोलले. पण दिल्लीच्या आंदोलनात जरांगे पाटील सहभागी होणार का? याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दिपकेंनी चांगलं लावून धरलंय…
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे 6 तारखेला दिल्लीत आंदोलन करणार आहेत, त्याविषयी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्या पोरांनी चांगलं लावून धरले आहे. कोण पोर आहेत माहित नाही, मात्र त्यांनी वातावरण चांगलं पेटवलंय. ही खदखद आहे, हा असंतोष आहे. म्हणून सांगतो महायुतीला आणि भाजपाला सांगतो की गरीबांचे मनं जिंका असे सूचक वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
दादागिरी जास्त दिवस चालत नाही
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानतळावरच अटक करण्याची भीती व्यक्त होत आहे. ते 6 जून रोजी आंदोलन करणार आहेत. या घडामोडींवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दिपके यांना अटक करायला त्यांनी बॉम्ब आणले का तिकडून? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. असंतोष आहे. पोरांचं म्हणणं काय ते ऐका. दादागिरी करायची नाही, दादागिरीने वातावरण पांगत असतं. पैशाने आणि दादागिरी लय दिवस चालत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
आमदार सत्तार यांच्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया?
भाजप हे स्लो पॉयझन असल्याचा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी काल केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्ही समाजावर अन्याय केल्यावर बोलतो, सत्तार असतील सरकार असतील ते घटक आहेत एक, ते राजकारणाबद्दल स्टेटमेंट असू शकत आपण राजकारणात बोलण्याची काही आवश्यकता नाही. मी सत्तार हे चुकीचे आहेत असं म्हणत नाही किंवा सरकार चुकीच आहे असेही म्हणत नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, कोणत्या पण सरकारला ताकद लाव म्हणावं. आम्ही पाठपुराव्याला खंबीर आहोत, असे मत त्यांनी वक्तव्य केले.
एका आदेशावर थांबू नका
सरकार कोणाचे असू द्या, महायुतीचं असू द्या नाही तर महाविकास आघाडीचा असू द्या. काम नाही केल्यावर कठोर भूमिका घेणार असा इशारा त्यांनी दिला. एक आदेश काढणार आणि समाधानी करणार हे जमणार नाही, बाकीचे लटकून ठेवणार हे जमणार नाही. 58 लाख नोंदी सापडलल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या व्हॅलिडीटी द्या याचे कडक आदेश काढले पाहिजे. नसता कारवाई करण्यात येईल, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कणाकण घरी पाठवलं पाहिजे, सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले का? असा खडा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.