
मराठा आरक्षणावरून मुंबईची तुंबई झाली. कालच्या सरकारी आणि आसमानी संकटांना तोंड देत मराठा आंदोलक अजूनही आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. बेमुदत उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी आझाद मैदानात उपोषणाचा नारा दिला होता. दरम्यान चर्चेची वेळ निघून गेल्यानंतर जरांगे यांनी आझाद मैदान जवळ केले. मुंबईची वेश वाशीपर्यंत मराठा आंदोलक विविध ठिकाणी अजूनही हजर आहेत. त्यातच या आंदोलनमागे विरोधकांची फूस असल्याचा हल्ला भाजपने केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे हे जनता जर्नादनाला माहिती, पण भाजपच्या या आमदाराने जे वक्तव्य केले आहे, त्याने एकच खळबळ उडाली. त्यावर टीकेची झोड उठली आहे. या बेताल वक्तव्यावर जरांगे अजून व्यक्त झालेले नाहीत.
जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब
भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथून एक भलतेच विधान केले आहे. मनोज जरांगे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सूसाईड बॉम्ब असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानाची एकच चर्चा होत आहे. शरद पवार हे मनोज जरांगे यांचा वापर करत आहेत. त्यांनी जरांगे यांच्या रुपाने हा सुसाईड बॉम्ब राज्याचे प्रगतीशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यासाठी तयार केल्याचा आरोप केणेकर यांनी केला.
पवारांनी राज्यात दंगली घडवल्या
जरांगे यांच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. शरद पवार हे जरांगे सारखे सूसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात हे राज्याचं दुर्देवं आहे. त्याचा राज्यावर परिणाम होईल. पवारांची कारकीर्द पाहिली तर ती अशीच राहिलेली आहे. त्यांनी कुणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. त्यांचा इतिहास तपासून पाहा. महाराष्ट्र अराजकतेकडे नेणे. जाती जातीत भांडणं लावणे हे काम पवारांनी केलं आहे. वसंतदादांपासून ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत पवारांनी राज्यात दंगली घडवल्या असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केला.
फडणवीसांविषयी व्यक्तिगत आकस आहे. जातीय द्वेष आहे. त्यामुळे जरांगे यांच्यामार्फत गावागाड्यातील मराठ्यांना विरोधात उभं करण्यात येत आहे. जरांगे हे शरद पवारांचा सूसाईड बॉम्ब असल्याचे वक्तव्य केणेकर यांनी केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात आता भाजपमधून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको अथवा मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे ते आता जरांगे हे सूसाईड बॉम्ब असल्यापर्यंतच्या टोकाच्या भूमिका सत्ताधाऱ्यांमधून उमटायला सुरुवात झाली आहे.