
मराठा आरक्षणासाठी राज्यात वेगळे आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. उपोषण सोडल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कुरबुरीवरून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना सुट्टी होणार आहे. त्यांनी अगोदरच आता अभिनव आंदोलन करणार असल्याचे ठणकावले आहे. उपोषणाच्या अस्त्रानंतर जरांगे पाटील कोणते आंदोलन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक इंच मागे हटणार नाही
तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच मागे हटणार नाही. कितीही ताकद लावायची ती लावणार आणि आरक्षण मिळवणार. आम्ही उपोषण केले, शांतपणे आंदोलन केले. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या एक महिन्यात गाठी भेटी नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा या ठिकाणी अडचणी घेऊन या, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. एक महिन्यात राज्यातील गावा गावातील अडचणी छत्रपती भवन येथे सोडवल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत आंदोलनाची तयारी
लवकरच आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिली. आता समोरासमोर आंदोलन करण्यात येईल असे जरांगे पाटील म्हणाले. कुणबी आणि मराठा एकच आहेत, आणि हे विदर्भ आणि खानदेश मधील मराठ्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. फडवणीस यांना बापाची माया आहे हे काल दिसून आले, ते वर्षावर जाणार पण माझ्या मुलीची परीक्षा आहे, असे ते म्हणाले.
लेक काय असते तुम्हाला कळाले, आमच्या लेकरांच्या आत्महत्या झाल्या, हे तुम्हाला का कळत नाही, आमच्या लेकरांची माया का येत नाही, आरक्षण का देत नाहीत. स्वतःच्या मुलीचा शब्द मोडत नाहीत. तुम्ही आमचे EWS घालवले आणि खापर आमच्यावर फोडतात. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या मागण्यांबाबत काहीही निर्णय घेतला नाही, हा भेदभाव कशामुळे, असा सवाल त्यांनी केला.
आज रुग्णालयातून मिळणार सुट्टी
मनोज जरांगे यांना आज गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल. जरांगे पाटील यांनी सहा दिवस उपोषण केल्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधणार आणि त्यानंतर जरांगे हे त्यांच्या शहागड येथील राहत्या घरी जाणार आहेत.
जरांगे यांनी उपोषण केल्यानंतर त्यांच्या या मागण्या झाल्या होत्या मान्य
१) कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल.
२) हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल व त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल
३) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर दाखल झालेल्या केसेस, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाईस गती देण्यात येईल
४) कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही यापुढे चालू राहील.