
उद्धव ठाकरे शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी गुलमंडीवर जाहीर सभा घेतली. त्यात महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. त्यांनी सरकारवर आसूड ओढला. सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार जोपर्यंत कर्जमाफी करणार नाही, तोपर्यंत शिवसैनिक सरकारला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याचवेळी विरोधी पक्षनेता पदावरुन त्यांनी सरकारला डिवचले तर दोन उपमुख्यमंत्रिपदावरून सरकारला सुनावले.
हंबरडा मोर्चा नव्हे, इशारा मोर्चा
हा हंबरडा मोर्चा नाही, इशारा मोर्चा आहे. तुम्ही कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम त्यांनी महायुती सरकारला भरला. जिल्हा परिषदेत बघा तुमच्यासमोर गुडघ्यावर येतील. शिवभोजन बंद. आनंदाचा शिधा बंद. एक रुपयात पिक विमा बंद. पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं. २०१४ रोजी मोदींनी वचनं दिलं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. झालं का. आज २०२५ साल उजाडलं. तरीही उत्पन्न वाढलं नाही. आता नुकसान तरी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
मतचोरी उघड झाली. बिहारची निवडणूक आली. प्रस्ताव नसताना महिलांना बिहारमध्ये १० १० हजार दिले. महिलांना पैसे दिले याला विरोध नाही. संपूर्ण देशातील महिलांच्या खात्यात पैसे द्या. तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाही. देशाचे पंतप्रधान आहात. पीएम केअर फंडातील १०-१० हजार महिलांच्या खात्यात का टाकला जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
दोन्ही उपमुख्यमंत्रीही नकोच
हे सरकार विरोधी पक्ष नेता नेमत नाही. संख्याबळ नाही. नियम नाही. विरोधी पक्ष नेमण्यासाठी कायदा कानून हवा. तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. असंवैधानिक रित्या दोन उपमुख्यमंत्री करता. त्यांचे उपमुख्यमंत्रीपद काढा. विरोधी पक्षनेता नेमत नसाल तर उपमुख्यमंत्रीही नकोच. आम्ही उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही. पाशवी बहुमत असूनही तुम्ही विरोधी पक्षनेता नेमत नाही. तुम्ही आम्हाला घाबरता. पद नाही दिलं तरी हरकत नाही. आमच्यापाठी जनता आहे. विरोधी पक्षनेता पद द्यायला तयार नाही. का तर संविधानात तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्रीपदाची तरतूद कशी दाखवता, असा खडा सवाल ठाकरे यांनी केला.