Sanjay Nirupam : रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल

Sanjay Nirupam : "आम्ही हे सगळं मतदानासाठी करत नाही. तुम्ही पण करता तुमचे किती आमदार, खासदार येतात. तुम्ही मराठी भाषेचा आग्रह मतांसाठी करतात का?" असं संजय निरुपम यांनी मनसेला उत्तर दिलं.

Sanjay Nirupam : रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल
Sanjay Nirupam
| Updated on: Apr 24, 2026 | 11:01 AM

“मराठी लिहिण, बोलणं आणि वाचण्याची एक टेस्ट होईल. समजा ते टेस्टमध्ये फेल झाले तर त्यांचं परमिट रद्द होईल, बॅच जप्त होईल. हे एकच अन्यायकारक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मी बोललो, त्यांना पत्र पाठवलय. तुम्ही असं करु नका” असं संजय निरुपम म्हणाले. “रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मराठीतून संवाद साधला पाहिजे. पण त्यांची चाचणी घेऊ नका, कारण ते जास्त शिकलेले लोक नाहीत. जास्त शिकलेले लोक रिक्षा, टॅक्सी चालवणार का?” असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला. “शेवटी महाराष्ट्राच्या राज्य घटनेत एक तरतूद आहे, त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारकडून मराठी भाषा संवर्धनाचं काम झालं पाहिजे” असं निरुपम म्हणाले.

“राज्य घटनेत तरतूद आहे, देशातील नागरिक कुठेही जाऊन धंदा करु शकतो. रोजी रोटी कमावू शकतो. त्याला समानतेचा अधिकार आहे. भाषा, जाती, धर्म या आधारावर भेदभाव करु शकत नाही. तशी तरतूद आहे” असं संजय निरुपम म्हणाले. “आम्ही सर्व हिंदू आहोत, भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे आमच्या लोकांमध्ये भाषा, धर्म या आधारावर भेदभाव झाला तर ते राज्य घटनेविरोधात असेल” असं संजय निरुपम बोलले.

मराठी सक्तीची केल्याने लोकांना त्रास होईल

“माझी अशी विनंती आहे की, व्हेरिफेकेशन करण्याआधी महाराष्ट्र शासनाने रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले यांच्यासाठी मराठी शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे. फक्त रिक्षा, टॅक्सीवालेच का?. कॉर्पोरेटमध्ये काम करणारे रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का?. झोमॅटो, स्विगीवरुन पार्सल घेऊन येणारे मराठीत बोलतात का?” असे प्रश्न संजय निरुपम यांनी विचारले आहेत. “सगळ्यांना मराठी भाषा शिकवण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला पाहिजे. आम्ही कोणी मराठी भाषेच्या विरोधात नाही. मराठी सक्तीची केल्याने लोकांना त्रास होईल म्हणून आम्ही आवाज उठवतोय” असं संजय निरुपम म्हणाले.

तुम्ही मराठी भाषेचा आग्रह मतांसाठी करतात का?

मनसेचे संदीप देशपांडे तुम्हाला टुकार माणूस म्हणाले, एवढ करुन तुम्हाला मत मिळत नाहीत, असं म्हणाले. त्यावर संजय निरुपम यांनी “आम्ही हे सगळं मतदानासाठी करत नाही. तुम्ही पण करता तुमचे किती आमदार, खासदार येतात. तुम्ही मराठी भाषेचा आग्रह मतांसाठी करतात का?” असं टीकेला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले.

Follow Us